scorecardresearch

माणसं जोडणाऱ्या माणसाचे जाणे..

पत्रकारिता करीत असतानाच सामाजिक प्रश्नांवरील लेखन, ललित लेखन, काव्य लेखन, ओरिगामी, बासरीवादन, गायन अशा विविध माध्यमांतून अवचट यांनी आपल्या जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून दिली होती.

पुणे : ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट (वय ७७) यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यामागे मुक्ता पुणतांबेकर आणि यशोदा वाकणकर या कन्या, तसेच मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचा परिवार आहे.

अवचट यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध मान्यवरांनी पत्रकारनगर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर धार्मिक विधी टाळून वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पत्रकारिता करीत असतानाच सामाजिक प्रश्नांवरील लेखन, ललित लेखन, काव्य लेखन, ओरिगामी, बासरीवादन, गायन अशा विविध माध्यमांतून अवचट यांनी आपल्या जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून दिली होती. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस.ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी पत्नी डॉ.  सुनंदा (अनिता) अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. बिहारमधील अनुभवांवरील सामाजिक लेखांचा समावेश असलेले ‘पूर्णिया’ हे त्यांचे पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले होते. त्यानंतर डॉ. अवचट यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना हात घालत विपुल लेखन केलं. ‘कोंडमारा’ हा दलित अत्याचारांवरील सामाजिक लेखांचा त्यांचा संग्रह विशेष गाजला. तर, ‘माणसं’ या पुस्तकाद्वारे त्यांनी हमाल, विडीकामगार, वैदू यांच्या सामाजिक जीवनाचा लेखाजोखा मांडला. ‘कार्यरत’, ‘छंदांविषयी’, ‘स्वत:विषयी’, ‘गर्द’, ‘पुण्याची अपूर्वाई’, ‘सृष्टीत-गोष्टीत’ आणि ‘सुनंदाला आठवतांना’ ही त्यांची पुस्तके गाजली.

डॉ. सुनंदा आणि अनिल अवचट यांच्या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढेही असाच सुरू राहील, असे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी सांगितले. डॉ. अनिता अवचट यांच्या स्मरणार्थ दरवर्षी देण्यात येणाऱ्या संघर्ष सन्मान पुरस्कार सोहळय़ात पुढील वर्षीपासून डॉ. अनिल अवचट यांच्या स्मरणार्थ ‘सृजन सन्मान’ हा पुरस्कार देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व..

लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, चित्रकार, ओरिगामी कलाकार, बासरीवादक आणि विधायक कार्य करणाऱ्या संघटनांचे पाठीराखे असे अनिल अवचट हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. बहुआयामी म्हणजे काय याची प्रचीती अवचट यांच्याकडे पाहिल्यानंतर येत असे. 

अनिल अवचट यांचा जन्म २६ ऑगस्ट १९४४ रोजी पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. वडील ओतूर येथे वास्तव्य करीत असल्याने त्यांचे आठवीपर्यंतचे शिक्षण ओतूरलाच झाले. आठ भावंडांत ते सर्वात मोठे असल्याने त्यांनी डॉक्टर व्हावे ही वडिलांची तीव्र इच्छा होती. गावात राहून हे जमणे कठीण असल्यामुळे वडिलांनी त्यांना पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये वसतिगृहामध्ये शिक्षणासाठी ठेवले. १९५९ मध्ये एस.एस सी. झाल्यावर फग्र्युसन महाविद्यालयामधून ते इंटर आणि पुण्याच्याच बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. झाले. याच महाविद्यालयातील मैत्रीण सुनंदा म्हणजेच डॉ. अनिता अवचट यांच्यासमवेत त्यांचा विवाह झाला.

समाजकार्याकडे कल असल्याने वैद्यकीय व्यवसाय न करता अवचट यांनी सामाजिक चळवळीमध्ये सहभाग घेतला. सामाजिक क्षेत्रातील अनुभवाशी निगडित अशा प्रकारचे लेखन ‘साधना’ साप्ताहिकातील ‘वेध’ या सदरातून त्यांनी केले. ‘साधना’ व ‘पुरोगामी सत्यशोधक’ या त्रमासिकाचे संपादनही त्यांनी केले. युवक क्रांती दल म्हणजेच युक्रांदला अर्पण केलेले ‘पूर्णिया’ हे बिहारच्या समाजदर्शनाविषयीचे त्यांचे पहिले पुस्तक १९६९ मध्ये प्रकाशित झाले. एका समाजवादी निष्ठेच्या तरुणाची, प्रतिकारशून्य गुलामगिरीविषयीची प्रतिक्रिया यात व्यक्त झाली आहे.

अनिल अवचट यांच्या लेखनाला समाजशास्त्रीयदृष्टय़ा महत्त्व आहे. रिपोर्ताज शैलीला नवे परिमाण त्यांच्या लेखनशैलीने दिले. तसेच १९७० नंतरच्या गद्यलेखनाला त्यांच्या लेखनाने नवे आयाम प्राप्त करून दिले. ‘गर्द’ या पुस्तकातून अनिल अवचट यांनी अमली पदार्थाच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांच्या व्यथा जगासमोर आणल्या. हे पुस्तक लिहिताना आलेले अनुभव आणि त्यानंतर पु. ल. देशपांडे यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि पत्नी सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने त्यांनी ‘मुक्तांगण’ हे व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले.

आयोवा विद्यापीठातर्फे १९८८ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखक परिषदेमध्ये अवचट यांची भारतातर्फे निवड झाली होती. फाय फाउंडेशन पुरस्कार, अनंत भालेराव स्मृती पुरस्कार, लाभसेटवार पुरस्कार, शंकरराव किर्लोस्कर पुरस्कार, न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानचा सामाजिक न्याय पुरस्कार असे पुरस्कार त्यांना लाभले होते. ‘सृष्टीत गोष्टीत’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार मिळाला होता. 

पुरस्कार..

अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कारासह प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्काराने अवचट यांचा सन्मान करण्यात आला होता. व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 

पुस्तके

वेध,  हमीद,  अंधेरनगरी, निपाणी,  छेद,  माणसं,  संभ्रम, वाघ्यामुरळी, कोंडमारा,  गर्द, धागे आडवे-उभे, धार्मिक,  स्वत:विषयी, अमेरिका,  कार्यरत, आप्त,  छंदांविषयी, प्रश्न आणि प्रश्न, जगण्यातले काही, मजेदार ओरिगामी, पुणे हवेसे, लाकूड कोरताना, सरल-तरल,  बहर शिशिराचा, अमेरिकेतील फॉल सीझन, – सृष्टीत गोष्टीत

दिलखुलास आणि रसिकता ही अनिलची वैशिष्टय़े होती. जितकी शब्दचित्रं तो उत्तम रेखाटायचा तितकीच विविध कलांमध्ये त्याला विलक्षण रुची होती. लेखन, कला आणि सामाजिक कार्याद्वारे त्याने आपले आयुष्य समृद्ध केले. – डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

आमच्या चर्चेतूनच युवक क्रांती दलाची स्थापना झाली. पत्नी सुनंदा हिच्यासमवेत अनिलने मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. अनिलचे लेखन हा युक्रांदच्या वैचारिक भूमिकेचा विस्तार आहे. – डॉ. कुमार सप्तर्षी, संस्थापक, युवक क्रांती दल

१९७२ च्या बिहारमधील दुष्काळाच्या वार्ताकनाकरिता तो ‘माणूस’चा प्रतिनिधी म्हणून गेला आणि त्यातूनच ‘पूर्णिया’ हे पुस्तक जन्माला आले. २५ वर्षांनंतर पुन्हा जाऊन बदललेला ‘पूर्णिया’ शब्दबद्ध कर आणि ‘पूर्णिया २’ हे पुस्तक प्रकाशित करू असे त्याला सुचविले होते. मात्र, त्याच्या व्यापामुळे त्याला हे जमू शकले नाही. ही खंत अनिल पुढील अनेक भेटींमध्ये बोलून दाखवत होता. अनिल हा केवळ बहुगुणी लेखक नव्हता, तर सामाजिक भान सतत  ठेवणारा जागरूक लेखक होता. – दिलीप माजगावकर, राजहंस प्रकाशन

१९६७ ते १९७२ या काळात त्यांनी संपादक यदुनाथ थत्ते यांच्या नेतृत्वाखाली विपुल लेखन केले. त्यांच्या जाण्यामुळे साधना परिवारातील महत्त्वाचा सदस्य गमावला. – विनोद शिरसाठ, संपादक, साधना साप्ताहिक

 ४४४

व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य या क्षेत्रात अवचट यांनी संस्थात्मक आणि भरीव योगदान दिले. त्यांचे चौफेर लेखन आणि साहित्यकृती, सामाजिक कार्य हे पुढच्या कित्येक पिढय़ांसाठी प्रेरणादायी ठरेल.  – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, पत्रकार डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने डोळसपणे सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे हळवे-सहृदयी व्यक्तिमत्त्व हरपले.   –  शरद पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष

लेखक, सामाजिक कार्यकर्ता म्हणून नाही, तर एक चांगला माणूस म्हणून आपण येणाऱ्या पिढय़ांना माहिती असावे, असे ते नेहमी बोलून दाखवीत. तीच ओळख जपण्याचे कार्य त्यांनी केले.   – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

संवेदनशील मनाबरोबरच कृतिशील लेखक आणि चळवळीचा कार्यकर्ता अशीच अनिल अवचट यांची ओळख होती. परिवर्तनाबद्दलची त्यांची दृष्टी सजग होती. त्यांच्या निधनाने साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले आहे. – डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Senior writer and social activist dr anil awachat passed away akp

ताज्या बातम्या