पुणे : ‘सध्या समाजातील सहिष्णुता कमी होते आहे. समाजाच्या भावना टोकदार झाल्या आहेत. विनोदासाठी पोषक वातावरण नसल्याने विनोदनिर्मिती कमी होते आहे,’ असे मत ज्येष्ठ लेखक भानू काळे यांनी सोमवारी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे काळे यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांना ‘वि. वि. बोकील पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. वि. वि. बोकील यांचे पुत्र रमेश बोकील, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार या वेळी उपस्थित होते.
काळे म्हणाले,‘सहिष्णुता हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. आता तोच कमी होताना दिसतो आहे. सहिष्णुतेमुळे विविधता असूनही आपण एक आहोत. सध्या विनोदातली निरागसता हरवते आहे. जीवनाकडे अनावश्यक गांभीर्याने पाहण्याची वृत्ती वाढते आहे. समाजाच्या भावना टोकदार झाल्या असून, कोणत्या वाक्याने, कोणाच्या भावना दुखावतील हे सांगता येत नाही. विनोद करण्यासारखे वातावरण राहिलेले दिसत नाही.’ गोडबोले म्हणाल्या, ‘विनोद जीवनाचे वास्तव टिपतो. समाजात काय सुरू आहे, काय बदलते आहे आणि काय होऊ शकते, हे नेमकेपणाने विनोदातून सांगता येते. काव्य आणि शास्त्रापेक्षाही विनोद जीवनाच्या अधिक जवळ जातो. जीवनाच्या सर्व टप्प्यांवर विनोद असतो. आपल्याला केवळ तो हेरण्याची, खिलाडू वृत्तीने स्विकारण्याची तयारी असावी लागते.’
प्रा. जोशी म्हणाले,‘विनोदबुद्धी हरवणे समाजाच्या अधोगतीचे लक्षण आहे. चांगला विनोद निर्माण होईल. मात्र, विनोद पचविण्याची क्षमता समाजात असायला हवी. वैचारिक पचनक्षमता कमी झाली, की समाजाचे सांस्कृतिक अधःपतन होते.’ मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी सूत्रसंचालन केले, आभार मानले.
विनोद आजही आहे, कालही होता. त्याचे क्षेत्र उद्याही विस्तारेल. मात्र, सहिष्णुता वाढेल का हा खरा प्रश्न आहे. सध्या नेत्यांविरोधात बोलायचे धाडस उरलेले दिसत नाही. ज्या समाजात चांगला विनोद असतो, त्या समाजाची अभिरूचीही चांगली असते. त्यामुळे समाजात चांगला विनोद रूजायला हवा.– मंगला गोडबोले, ज्येष्ठ लेखिका