पुणे : ‘सध्या केवळ राजकारण्यांचे राज्य आले आहे. ‘पुलं’ ज्या काळात लिहित होते, तेव्हाची राजकीय परिस्थिती साहित्यासाठी पोषक होती. आता सुरू असलेल्या राजकारणामुळे ‘पुलं’नी लेखणी मोडून टाकली असती,’ अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी बुधवारी व्यक्त केली.
कोहिनूर उद्योग समूह, लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सो. लि., प्रथमेश कन्स्ट्रक्शन आणि बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने बालगंधर्व कलादालन येथे आयोजित ‘ग्लोबल पुलोत्सवा’निमित्ताने ‘पुलंचा विनोद : समकालीन का सर्वकालीन?’ या परिसंवादात फुटाणे बोलत होते. फुटाणे यांच्यासह लेखिका रेखा इनामदार-साने, चारुहास पंडित, श्रीकांत बोजेवार परिसंवादात सहभागी झाले होते. साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार या वेळी उपस्थित होते.
फुटाणे म्हणाले, ‘पुलंना मराठवाडा, खान्देशी, कोकणी, वैदर्भीय आणि मुंबई-पुणे या सगळ्या भागांतील भाषेचा लहेजा आणि त्या भागांतील समाजव्यस्थेची जाण होती. त्यामुळे त्यांचा विनोद सर्व स्तरांवर स्वीकारला गेला. सामाजिक क्रांतीचा आणि सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास करायचा झाल्यास पुलंचे साहित्य दीपस्तंभासारखे आहे.’
“पुलं’च्या साहित्याची मागणी आजही कायम आहे. ‘पुलं’ केवळ विनोदी साहित्यिक नव्हते, तर ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा विनोदही त्यांच्याप्रमाणे निर्विष होता. कोणालाही दुखावण्याची भावना त्यात नव्हती. जोपर्यंत आपल्या जगण्यात आनंद आणि रसरशीतपणा आहे, तोपर्यंत ‘पुलं’चा विनोदही टिकेल,’ अशी भावना ईनामदार-साने यांनी व्यक्त केली.
बोजेवार म्हणाले, ‘पुलंच्या विनोदातील संदर्भ काळानुरूप बदलत चालले आहेत. मात्र, त्यातील रसरशीतपणा आजही कायम आहे. सध्या विनोदातील संदर्भ साक्षरता कमी होताना दिसत आहे. त्यामुळे ‘पुलं’च्या विनोदाबाबत चिंता वाटते. नव्या पिढीला त्यांचा विनोद समजून घेणे आव्हानात्मक आहे.’
‘विनोद आणि कारुण्य यांची सांगड घालून ‘पुलं’नी अतिशय समर्पक साहित्य निर्मिती केली. त्यांनी सगळ्या मराठीजनांचे जगणे समृद्ध केले. विनोद कसा असावा, याचे उत्तम चित्रण त्यांच्या साहित्यात दिसून येते,’ असे चारुहास पंडित यांनी सांगितले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.