पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील गरीब रुग्णांसाठी आशेचा किरण असलेले ससून रुग्णालय आता गैरकारभारांचा अड्डा बनले आहे. रक्ततपासणी अहवाल बदलण्यापासून अमली पदार्थांच्या सूत्रधाराला मदत करण्यापर्यंतच्या गैरप्रकारांत चक्क डॉक्टरांचाच सहभाग असल्याचे आरोप होत असल्याने ‘ससून’ची प्रतिमा खालावली आहे. सर्वोपचार रुग्णालयातील सगळा कारभारच ‘गंभीर आजारी’ असून, त्यावर उपचार करायला व्यवस्थेकडे ‘औषध’ आहे का, असा सवाल विचारला जात आहे.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयात वारंवार गैरप्रकार घडत आहेत. मात्र, केवळ समित्या नेमण्याचा सोपस्कार केला जात आहे. या समित्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे अहवाल सादर करून अनेक महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही त्यावर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे केवळ चौकशीचा खेळ सुरू असल्याचे चित्र आहे. काही वेळा वैद्यकीय शिक्षण विभागाने निर्णय घेतल्यास रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी त्याला विरोध केल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय शिक्षण विभागातील राजकारणामुळे ससूनमधील गोंधळ आणखी वाढत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. विशेषत: गेल्या सहा-सात महिन्यांत घडलेल्या प्रकारांमुळे ससूनची प्रतिमा डागाळली आहे.

आणखी वाचा-ससूनमधील डॉ. अजय तावरेंची वादग्रस्त कारकिर्द; मूत्रपिंड रॅकेटपासून आमदाराच्या शिफारसपत्रापर्यंत…

ललित पाटील प्रकरणात कारवाईस टाळाटाळ (ऑक्टोबर २०२३)

ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा सूत्रधार ललित पाटील याने पलायन केल्याप्रकरणी राज्य सरकारने चार जणांची चौकशी समिती नेमली होती. या समितीने ललित पाटील प्रकरणात रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना दोषी धरले. डॉ. ठाकूर हे स्वत: पाटील याच्यावर उपचार करीत होते. त्यामुळे राज्य सरकारने त्यांना पदावरून हटवून खात्यांतर्गत चौकशी सुरू केली. मात्र, त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही.

निवासी डॉक्टरांची मद्य पार्टी (डिसेंबर २०२३)

ससून रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी ३१ डिसेंबरला मद्य पार्टी केली होती. त्या वेळी काही मद्यधुंद डॉक्टरांनी गोंधळ घालून निवासी महिला डॉक्टरांच्या खोलीच्या दरवाजाची काच फोडली होती. या प्रकरणाची दखल खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली होती. त्यांनी ससूनमध्ये आयोजित कार्यक्रमात या पार्टीची छायाचित्रे दाखविली होती. यानंतर वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने नऊ निवासी डॉक्टरांचे सहामाही सत्र पुढे ढकलण्याची कारवाई केली. नंतर या निवासी डॉक्टरांना प्रत्येकी ३०० रुपये दंड आणि त्यांची सहा महिन्यांसाठी वसतिगृहातून हकालपट्टी अशी सौम्य शिक्षा करण्यात आली.

आणखी वाचा-‘पोर्श’मध्ये तांत्रिक बिघाड नव्हता! आरटीओचा प्राथमिक अहवाल; कंपनीच्या तंत्रज्ञांकडूनही मोटारीची तपासणी

रॅगिंगचा सावळागोंधळ (मार्च-एप्रिल २०२४)

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने रॅगिंगची तक्रार मार्च महिन्यात केली होती. या प्रकरणी चौकशी करून हा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला. त्यावरील कारवाईही प्रलंबित आहे. याचबरोबर एप्रिल महिन्यातही पदव्युत्तरच्या आणखी एका विद्यार्थिनीने रॅगिंगची तक्रार केली होती. याची चौकशी महाविद्यालयाच्या एका समितीकडून पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या समितीकडे सोपविण्यात आली. त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न महाविद्यालय प्रशासनाकडून सुरू आहे.

उंदीर चावा प्रकरण (एप्रिल २०२४)

ससूनमध्ये अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल रुग्णाला उंदराने चावा घेतल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला होता. ही घटना १ एप्रिलला घडली होती. या रुग्णाचा मृत्यू झाल्याने याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने चौकशी करून आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सादर केला. रुग्णालयाच्या साफसफाईची जबाबदारी वैद्यकीय उपअधीक्षक सुजित धिवारे यांचे पद तातडीने काढून घेण्यात आले. चौकशी अहवाल मिळाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना पदावरून हटविले होते.

आणखी वाचा-पुणे पोर्श कार अपघात प्रकरण : अंजली दमानियांनी अजित पवारांना विचारले पाच प्रश्न; म्हणाल्या “शुल्लक गोष्टींवर…”

रक्त तपासणी नमुन्यातील बदल (मे २०२४)

ससून रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना त्यांच्या सांगण्यावरून मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने बदलल्याचा आरोप आहे. यामुळे ससून रुग्णालयातील एकूणच गैरप्रकारांनी कळस गाठल्याचे उघड झाले आहे.

ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडून सादर केला जाईल. हा प्रस्ताव मिळाल्यानंतर तो मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल. त्यानंतर त्यावर कार्यवाही होईल. -दिनेश वाघमारे, सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग