पुणे : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कर्करोगावर विकसित केलेल्या ‘सर्वाव्हॅक’ या लशीला जागतिक आरोग्य संघटनेची पूर्वपात्रता मिळाली आहे. पुरुषांमधील गुदद्वाराचा कर्करोग, तसेच महिलांमधील गर्भाशयाच्या मुखाचा, योनीच्या बाह्य भागाचा, योनीमार्गाचा आणि गुदद्वाराचा कर्करोग रोखण्यासाठी ही लस उपयुक्त ठरणार आहे.

भारतात विकसित झालेल्या ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही ) प्रतिबंधक ‘सर्वाव्हॅक’ या स्वदेशी लशीमुळे ‘एचपीव्ही’शी संबंधित आजारांपासून संरक्षण होणार आहे. या पूर्वपात्रतेमुळे लशीच्या जागतिक वापराचा मार्ग मोकळा होणार आहे, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या पूर्वपात्रता प्राप्त लशींच्या यादीत समावेश झाल्याने संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांना भविष्यात या लशीची खरेदी करता येणार आहे. ‘सर्वाव्हॅक’ला यापूर्वी भारतात औषध नियंत्रक महासंचालकांनी वापरासाठी मान्यता दिली आहे. ‘एचपीव्ही’च्या चार प्रकारांमुळे होणाऱ्या विविध आजारांपासून संरक्षणासाठी या लशीचा वापर केला जातो. पुरुषांमधील गुदद्वाराचा कर्करोग, तसेच महिलांमधील गर्भाशयाच्या मुखाचा, योनीच्या बाह्य भागाचा, योनीमार्गाचा आणि गुदद्वाराचा कर्करोग रोखण्यासाठी ही लस उपयुक्त आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

जैवतंत्रज्ञान विभाग आणि गेट्स फाउंडेशन यांच्या सहकार्याने ‘सर्वाव्हॅक’ विकसित करण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या पुण्यातील हडपसर आणि मांजरी येथील उत्पादन विभागांतून वर्षाला सुमारे चार अब्ज डोस निर्मिती केली जाणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विकसित केलेली ही लस नऊ ते २६ वर्षे वयोगटातील मुली आणि मुलांसाठी उपयुक्त आहे. इन्स्टिट्यूटला मिळालेली ही ३२ वी जागतिक आरोग्य संघटनेची पूर्वपात्रता आहे. लसीकरणाचे वेळापत्रकही वयोगटानुसार निश्चित करण्यात आले आहे. ९ ते १४ वर्षे वयोगटातील व्यक्तींना दोन डोस, तर १५ ते २६ वर्षे वयोगटातील व्यक्तींना तीन डोस दिले जातात. ही लस स्नायूमध्ये टोचून दिली जाते.

कर्करोगाला रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल – आदर पूनावाला

‘सर्वाव्हॅक’ लशीला मिळालेली जागतिक आरोग्य संघटनेची पूर्वपात्रता ही ‘एचपीव्ही’ विरोधातील जागतिक प्रतिसाद मजबूत करणारे महत्त्वाचे पाऊल आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, सीरम इन्स्टिट्यूट, अदर पूनावाला यांनी दिली.