पुण्याच्या जुन्नरमधील सात वर्षांच्या चिमुकल्यानं आगळीवेगळी करामत करून दाखवली आहे. त्यानं प्ले कार्ड तब्बल १३९ फूट लांब फेकल्याने त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. शौर्य किशोर काकडे अस या अवलियाचे नाव आहे. दोन्ही बोटांमध्ये पत्ता धरून तो हवेत भिरकावतो. गेल्या वर्षभरापासून तो सराव करत असून २१७ फुटांचा रेकॉर्ड त्याला ब्रेक करायचा असल्याचं त्याचे वडील किशोर काकडे सांगतात. शौर्य वाऱ्याच्या गतीने पत्ता फेकतो. कधी-कधी या पत्त्याचा वेग इतका असतो की हा फेकलेला पत्ता एखाद्या टरबूजच्या मधोमध रुतलेला पहायला मिळतो.

इतर मर्दानी खेळातही पारंगत!

शौर्य केवळ प्ले कार्डच नाही, तर मर्दानी खेळ देखील खेळतो. त्यात, तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी-काठी असे खेळ खेळतो जे भल्या- भल्यांना जमत नाहीत. शौर्य त्याच्या नावाप्रमाणेच कृती करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

शौर्य आपल्या काही मित्रांसह प्ले कार्ड खेळायचा. ते खेळत असताना हटके स्टाईलने दोन बोटात पकडून पत्ते हवेत भिरकावत असे. हे फेकलेले पत्ते दूरपर्यंत जायचे.  सर्वसामान्य व्यक्तीने पत्ते ताकदीने फेकले तरी तेवढ्या लांब जात नाहीत. वडिल किशोर यांनी त्याचा हा छंद हेरला. त्याला प्रोत्साहन द्यायचं ठरवलं. प्ले कार्ड बाबत त्यांनी गुगलवर शोध घेऊन प्ले कार्ड थ्रो करण्याचा खेळ असतो हे शोधलं.

आता २१७ फूट अंतराचं लक्ष्य!

वेळात वेळ काढून शौर्यकडून सराव करून घेतला. गेल्या वर्ष भरापासून शौर्य यात पारंगत झाला आहे. नुकतंच त्याने तब्बल १३९ फूट लांब प्ले कार्ड फेकलं. याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. पुढील काही काळात जागतिक पातळीवरील २१७ फूट लांब प्ले कार्ड फेकण्याचा रेकॉर्ड असून तो तोडण्याचा मानस असल्याचं किशोर काकडे यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना सांगितलं आहे.