पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यंदा निकाल ९३.३७ टक्के लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत त्यात २.१२ टक्के वाढ झाली आहे. परीक्षा दिलेल्या १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला असून मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे गुणवंतही एक हजारांनी वाढले आहेत.

यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली. राज्यातील ३ हजार ३२० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यंदा ९२.६० टक्के मुलगे, तर ९५.४९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षी ७ हजार ६९६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते. तर यंदा ८ हजार ७८२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. राज्यस्तरावर २७१ भरारी पथके नेमण्यात आली होती, तसेच जिल्हा स्तरावरही स्वतंत्र भरारी पथके नियुक्त करण्यात आली होती. त्यामुळे यंदा परीक्षेत गैरप्रकारांची संख्या घटल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, सहसचिव माणिक बांगर उपस्थित होते.

हेही वाचा >>>पुण्याचे शेकडो विद्यार्थी किर्गिस्तानमध्ये अडकले… घडले काय?

पुरवणी परीक्षेची प्रक्रिया सोमवारपासून

सर्व विषय घेऊन बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेंतर्गत जुलै-ऑगस्ट २०२४ आणि फेब्रुवारी-मार्च २०२५ या लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील. पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी २७ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरता येईल. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

सहा माध्यमांत परीक्षा घेण्यात आली. अंतर्गत परीक्षेचे गुण ऑनलाइन घेतल्यामुळे निकाल लवकर जाहीर होण्यास मदत झाली.– शरद गोसावी, राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष