scorecardresearch

पिंपरी- चिंचवडच्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारीत वाढ ; एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा आज बंद

सर्वाधिक तक्रारी चिखली भागातून येत असून  या तक्रारी निकाली काढत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान पाणीपुरवठा विभागासमोर असणार आहे.

पिंपरी- चिंचवडच्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारीत वाढ ; एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा आज बंद
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

हेल्पलाईनवर दिवसाला दहा ते बारा तक्रारी

पिंपरी, उन्हाळ्याला सुरूवात होताच पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पाण्याची समस्या गंभीर होऊ लागली आहे. शहराच्या विविध भागांतून कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. नागरिकांना तक्रार करण्यासाठी आणि या तक्रारी सोडविण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या  हेल्पलाईनवर दररोज १० ते १२ तक्रारी येत आहेत. सर्वाधिक तक्रारी चिखली भागातून येत असून  या तक्रारी निकाली काढत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान पाणीपुरवठा विभागासमोर असणार आहे.

हेही वाचा >>> पुणे : उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार

महापालिका पवना धरणातून दिवसाला ५१० एमएलडी आणि एमआयडीसीकडून ३० असे ५४० एमएलडी पाणी उचलते. शहरात २५ नोव्हेंबर २०१९ रोजी तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरात दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला. सव्वा तीन वर्ष होत आले तरी दिवसाआडच पाणी पुरवठा सुरू आहे. महापालिका पवना धरणातून दिवसाला ५१० एमएलडी पाणी उचलते. हे पाणी पवना नदीतून रावेत बंधाऱ्यावरून प्राधिकरणातील सेक्‍टर २३  येथील जलशुध्दीकरण केंद्रात आणून शुध्द केले जाते. त्यानंतर शहरातील विविध भागात पाणी वितरित करण्यात येते.

शहराची वाढती लोकसंख्या पाहता महापालिकेने आंद्रा धरणातून १०० आणि भामा आसखेड धरणातून १६७ असे २६७ एमएलडी पाणी आणण्याचे नियोजन केले. त्यादृष्टीने पहिल्या टप्प्यात आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी शहराला मिळणार आहे. हे पाणी निघोजे येथील बंधाऱ्यातून उचलण्यात येणार आहे. त्या पाण्यावर चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाईल. त्यानंतर भोसरीभागातील समाविष्ट गावांना  पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.  चिखलीतील जलशुध्दीकरण केंद्राचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र, उद्‌घाटनासाठी नेत्यांची वेळ मिळाली नसल्याने शहरवासीयांना हक्काच्या १०० एमएलडी पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे.

हेही वाचा >>> सध्या कोणत्याही गुजराती व्यक्तीला हिशोब विचारता येत नाही! प्रफुल्ल पटेल यांची टीका

गेल्यावर्षी महापालिकेच्या प्रत्येक जनसंवाद सभेमध्ये पाण्याच्या तक्रारींचे प्रमाण जास्त होते. त्यासाठी प्रशासनाने पाणी पुरवठ्याच्या तक्रारीकरिता २४ मार्च २०२२ रोजी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली. या हेल्पलाईनचा ७७२२०६०९९९ क्रमांक जाहीर केला. ही हेल्पलाईन बंद न करता वर्षभर पाणी पुरवठा विभागाने सुरू ठेवली. यावर्षी हेल्पलाईन २४ तास सुरू राहणार आहे. हेल्पलाईनचे काम सकाळ, दुपार व रात्र असे तीन पाळ्यांमध्ये चालते. जानेवारी महिन्यांपर्यंत अपुऱ्या पाण्याची एकही तक्रार येत नव्हती. मात्र, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून शहरातील अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ लागली आहे. कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. शहराच्या विविध भागातून अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या दररोज दहा ते बारा तक्रारी येऊ लागल्या आहेत.

या तक्रारी पाणी पुरवठा विभागाकडे पाठिवल्या जातात. त्यानंतर संबंधित तक्रारींवर कार्यवाही केली जाते, असे पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

आणि प्रभागातून सर्वाधिक तक्रारी

‘फ’ प्रभागातील चिखली गावठाण, जाधववाडी, तळवडे, रूपीनगर, त्रिवेणीनगर, निगडीगावठाण, नेवाळे, हरगुडे वस्ती, घरकुल, पूर्णानगर, संभाजीनगर परिसर आणि ‘इ’ प्रभागातील च-होली गावठाण, चोवीसावाडी, मोशी गावठाण, दिघी गावठाण परिसर, भोसरीतील गव्हाणे वस्ती, आळंदी, नाशिक रोड या भागातून  सर्वाधिक तक्रारी येतात. ‘ड’ प्रभागातील वाकड, पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर, वाकड परिसरातूनही काही प्रमाणात तक्रारी येत आहेत. कमी दाबाने आणि अपुरा वेळ पाणीपुरवठा होत असल्याबाबतच्या तक्रारींचे प्रमाण अधिक आहे.  सारथी हेल्पलाईनवर देखील काही तक्रारी येतात.

एमआयडीसीकडून होणारा शहराचा पाणीपुरवठा आज बंद

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) रावेत येथील पाणीपुरवठा केंद्रातील देखभाल दुरुस्तीची कामे आज (गुरुवारी) दिवसभर करण्यात येणार आहेत. त्यामुळे पिंपरी,चिचवड , भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, दिघी, व्हीएसएनएल, कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागातील आजचा पाणीपुरवठा बंद राहील. त्याचबरोबर शुक्रवारी पाण्याचा पुरवठा कमी दाबाने आणि अपुरा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नागरिकांनी  पाण्याचा साठा करण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन एमआयडीसीने केले आहे.

चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी उचलण्याची चाचणी सुरू आहे. त्यामुळे  २० ते ३० एमएलडी पाणी अधिकचे मिळत आहे. उर्वरित कामे पुढील आठ दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर १०० एमएलडी पाणी मिळेल आणि   पाणी कमी दाबाने येण्याच्या तक्रारी कमी होतील. प्रदीप जांभळे-पाटील- अतिरिक्त आयुक्त पिंपरी-चिंचवड महापालिका

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 21:26 IST
ताज्या बातम्या