इंदापूर : पूर्व युरोप आणि मध्य आशियातील गवताळ प्रदेश ही प्रजननभूमी असलेला आणि जागतिक स्तरावर संकरग्रस्त ठरत चाललेला शबल ससाणा इंदापूर तालुक्यातील भिगवण-कडबनवाडी वनक्षेत्रात दिसू लागल्याने पक्षी निरीक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे. कडबनवाडी येथील चिंकारा वन विहारात सफारी गाईड सुयोग गावडे यांना या दुर्मिळ ससाण्याचे दर्शन झाले असून त्यांनी त्याचा व्हिडिओ चित्रीत केला आहे.
शबल ससाणा हा भारतात हिवाळी पाहुणा म्हणून ओळखला जातो. त्याची प्रजननस्थळे पूर्व युरोप व मध्य आशियात असून हिवाळ्यात तो भारतीय उपखंडात स्थलांतर करतो. या ससाण्याची मादी तपकिरी रंगाची असते, तर नर फिकट करड्या रंगाचा असतो. राज्यात हा ससाणा काही ठिकाणी अधूनमधून दिसतो. भिगवण आणि वीर धरण परिसर हा त्याच्या उपस्थितीसाठी ओळखला जातो. मात्र, कडबनवाडीच्या गवताळ प्रदेशात त्याचे स्पष्ट दर्शन होणे ही पर्यावरणीय दृष्टीने महत्त्वाची नोंद मानली जात आहे.
जागतिक निसर्ग संरक्षण संघटना यांच्या अहवालानुसार शबल ससाणा ‘संकरग्रस्त’ प्रजातींमध्ये मोडतो. प्रजनन क्षेत्रातील गवताळ प्रदेशांचे घटते क्षेत्रफळ, शेतीतील रासायनिक फवारण्या, अधिवासातील बदल आणि मानवी हस्तक्षेप यामुळे या ससाण्यांच्या संख्येत घट होत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील वनक्षेत्रात त्याचे दर्शन होणे ही जैवविविधतेच्या दृष्टीने सकारात्मक बाब मानली जात आहे.
शबल ससाण्याबरोबरच अमूर ससाणा, सरडमार भोवत्या, नेपाळी गरुड, मोठ्या ठिपक्यांचा गरुड आदी स्थलांतरित शिकारी पक्ष्यांनी कडबनवाडीच्या गवताळ प्रदेशात मांदियाळी जमवली आहे. या भागातील मोकळे गवताळ क्षेत्र, लहान सस्तन प्राणी आणि अन्नसाखळीची उपलब्धता यामुळे शिकारी पक्ष्यांसाठी हा परिसर अनुकूल ठरत असल्याचे पक्षी अभ्यासक सुरेशचंद्र वारघडे सांगितले.
दरम्यान, यावर्षी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने फ्लेमिंगो पक्ष्यांच्या आगमनास काहीसा विलंब होत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. पाण्याची पातळी जास्त असल्याने उथळ पाणवठे आणि चिखलपट्ट्या उशिरा उपलब्ध होत आहेत. मात्र, याच कालावधीत इंदापूर तालुक्यात विविध स्थलांतरित पक्षी दिसू लागल्याने पक्षी निरीक्षक व छायाचित्रकारांसाठी हा काळ पर्वणीचा ठरत आहे.
भिगवण–कडबनवाडी परिसरातील गवताळ व अर्धजलचर अधिवासामुळे शिकारी पक्ष्यांसह इतर अनेक पक्ष्यांची उपस्थिती वाढत असून, या क्षेत्राचे पक्षी वैविध्यातील महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
स्थलांतरित शिकारी पक्षी कडबनवाडीच्या गवताळ प्रदेशात दिसू लागले आहेत. या भागातील मोकळे गवताळ क्षेत्र, लहान सस्तन प्राणी आणि अन्नसाखळीची उपलब्धता यामुळे शिकारी पक्ष्यांसाठी हा परिसर अनुकूल ठरत आहे. – सुरेशचंद्र वारघडे, पक्षी अभ्यासक
