scorecardresearch

“ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता”, कसबा पेठ पोटनिवडणुकीवर शैलेश टिळक यांचे विधान

ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे आणि बिनविरोधच होऊ शकते, असे विधान मुक्ता टिळक यांचे पती शैलेश यांनी व्यक्त केली. वाडेश्वर कट्यावर ते बोलत होते.

Shailesh Tilak on Kasba by election
कसबा पेठ पोटनिवडणुकीवर शैलेश टिळक यांचे विधान (image – loksatta team)

पुणे : “मुक्ता टिळक यांचा नगरसेवक ते आमदारपर्यंत प्रवास शहरातील नागरिकांना माहिती आहे. तसेच त्यांच्या राजकीय प्रवासात प्रत्येक व्यक्तीसोबत चांगला संवाद होता. त्याचबरोबर आता पोटनिवडणुकीमुळे सर्व पक्षांतील नेते इच्छुक असल्याचे समजत आहे. पण आज देखील वाटते की, आपली एक राजकीय संस्कृती आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यावर पोटनिवडणुकीत त्यांचाच कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळाल्यास ती निवडणूक बिनविरोध होते. मी देखील या निवडणुकी करीता इच्छुक आहे. त्याबाबत पक्ष नेतृत्वाकडून निर्णय घेतला जाईल की, कोणाला उमेदवारी देण्यात येईल. पण, ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे आणि बिनविरोधच होऊ शकते”, असे विधान मुक्ता टिळक यांचे पती शैलेश यांनी व्यक्त केली. वाडेश्वर कट्यावर ते बोलत होते.

अनेक निवडणुकांदरम्यान पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे हे आजपर्यंत वाडेश्वर कट्यावर इच्छुक उमेदवारांना बोलवून इडली सांबार, चहा असा नाष्टा करीत निवडणुकीबाबत चर्चा करतात. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी भाजपा नेत्यांकडून विरोधकांना करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज अशाच वाडेश्वर कट्याचे आयोजन करण्यात आले. या वाडेश्वर कट्यावर मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, भाजपचे नेते हेमंत रासने, धीरज घाटे, ठाकरे गटाचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे, माजी नगरसेवक विशाल धनवडे, काँग्रेस पक्षाचे नेते माजी नगरसेवक रविंद्र धंगेकर, माजी कमल व्यवहारे, नीता राजपूत, महापौर आम आदमी पार्टीचे विजय कुंभार उपस्थित होते. यावेळी सर्व इच्छुक उमेदवारांनी एकमेकांशी चांगला संवाद साधला.

भाजपमध्येच पाच जण इच्छुक, त्यांच्यातच सहानुभूती नाही : विशाल धनवडे

मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यानंतर भाजपाच्या नेत्यांकडून सांगितले गेले की, ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. पण यांच्याच पक्षातील साधारणपणे ५ जण इच्छुक आहे. त्यावरून भाजपमधील नेत्यांमध्ये सहानुभूती दिसत नाही. आम्ही निवडणुकीसाठी असून आमच्याकडून मी, शहर प्रमुख संजय मोरे आणि अन्य दोघे जण इच्छुक असल्याचे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी सांगितले.

पक्ष नेतृत्वाचा निर्णय अंतिम राहील : रविंद्र धंगेकर

मी तीन वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आलो असून दोन वेळेस विधानसभा निवडणुकीत निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. पण या पोटनिवडणुकीत मला काँग्रेस पक्षाने संधी दिल्यास निश्चित विजयी होईल. त्याचबरोबर आमची महाविकास आघाडी असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तीन पक्षांतील कोणाला कसबा विधानसभेची जागा सोडली जाते हे पहावे लागणार असून, पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो मला मान्य असणार असल्याची भूमिका काँग्रेस पक्षाचे नेते माजी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी मांडली.

कसबा विधानसभा निवडणुकीत आपचा उमेदवार विजयी होईल : विजय कुंभार

आम आदमी पार्टीचे दिल्ली, पंजाब आणि गुजरात निवडणुकीतील यश लक्षात घेता पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीचा उमेदवार निश्चित विजयी होईल, असा विश्वास आम आदमी पार्टीचे नेते विजय कुंभार यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोटनिवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक : अंकुश काकडे

कसबा विधानसभा पोटनिवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत आम्ही देखील तयारीला लागलो असून, अनेक जण इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून लवकरच भूमिका जाहीर केली जाईल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी मांडली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 13:34 IST