पुणे : ‘आमच्यातील कट्टर जमातवाले आम्ही हिंदुत्ववाद्यांचे आहोत, असे आरोप करतात. तर शेवटी हे मुसलमानच म्हणून कट्टर हिंदूत्त्ववादी विरोध करतात. दोन्ही जमातवादी सत्यशोधकांचा स्वीकार करत नाहीत. आता हे देशासमोरचे मोठे आव्हान आहे,’ असे मत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी रविवारी व्यक्त केले. ‘आताची परिस्थिती प्रतिकूल आहे. मात्र, त्यावर मात करत पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत,’ असेही त्यांनी सांगितले.

मनोहारी मैत्र संघाच्या वतीने डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांना ‘लोकनेते भाई वैद्य स्मृती पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य, संघटनेचे प्रमुख मनोहर कोलते उपस्थित होते.

तांबोळी म्हणाले, ‘आता सगळ्याच सत्यशोधकांसमोर अनेक आव्हाने आहेत. परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आहे. या संकटांच्या छाताडावर पाय ठेवून आम्ही उभे आहोत. अशा काळात भाई वैद्य यांचे विचार दीपस्तंभासारखे आहेत. भाईंनी भटशाही म्हणजे इथली पुरोहितशाही, मुल्लाशाही, उलेमाशाही आदी सर्वांचे निर्मूलन केले पाहिजे. अस्पृश्यतेचे, जातींचे, अज्ञानाचे, धर्मवादाचेच निर्मूलन केले पाहिजे, असा विचार सांगितला होता. धर्मवादाचे म्हणजे धर्माचे निर्मूलन असे ते कधीही म्हणले नव्हते. त्यांनी धर्माकडेही सकारात्मकतेने पाहता येते, अशीच शिकवण दिली आहे. हीच शिकवण पुढे घेऊन प्रतिकूलतेवर मात करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.’

‘प्रत्येक मुस्लिम हा जिहादी आहे. प्रत्येक डावा विचारवंत हा शहरी नक्षलवादी आहे. मग तो भलेही गांधीवादी-समाजवादी विचारसरणीचा असो, तो शहरी नक्षलवादीच ठरवला जातो. देशात भ्रष्टाचाराचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी नीटचा आणि आता शिक्षकांसाठीच्या टीईटीचा पेपर फुटला. मात्र, त्यांच्या विरोधात जो बोलेल, तो पाकिस्तानी ठरवलो जातो. आजच्या इतकी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या विचारांची गरज या देशाला कधीच नव्हती. आता मुस्लिम समाजाला स्वतःचे भले करून घ्यायचे असेल, तर त्यांनाही मुस्लिम सत्यशोधक मंडळांचा विचार स्वीकारावा लागेल,’ असे डॉ. वैद्य यांनी नमूद केले.

‘लोकशाही समाजवाद गरजेचा’

‘राजकारण आणि समाजकारण क्रूर व हिंसक होत आहे. गांधीवादी मंडळींनाही नक्षलवादी ठरवले जात आहे. अशा विपरीत परिस्थितीत कुराणापेक्षा संविधान श्रेष्ठ मानणाऱ्या, विवेकवादी, तत्त्वनिष्ठ आणि कृतीशील कार्यकर्ता म्हणून वावरणाऱ्या डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांचा सन्मान भाई वैद्य यांच्या नावाच्या पुरस्काराने होणे, गौरवाची बाब आहे. या निमित्ताने लोकशाही समाजवादाचा आवाद बुलंद व्हावा,’ असे मत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. ‘राजकीय पक्षांची कार्यकर्ते-नेते घडविणारी अभ्यास शिबिरे, कार्यशाळा, उपक्रम बंद पडत आहेत. अशा वेळीही मुस्लीम सत्यशोधक समाजाची शिबिरे सुरू आहेत. सकारात्मक घटकांविषयी संवाद आणि लोकशाहीवादी वृत्तीतून संघर्ष, असा दृष्टिकोन असला तर समाजवादी अर्थकारण निर्णायक पद्धतीने गती घेईल आणि लोकशाही समाजवादाला बळकटी मिळेल,’ असेही त्यांनी सांगितले.