पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहराच्या जागतिक ओळखीबद्दल केलेले विधान हे अत्यंत निंदनीय आणि बेजबाबदार आहे. ज्या शहराने शून्यातून विश्व निर्माण करून जागतिक पातळीवर स्वतःचे स्थान निर्माण केले, त्या शहराबद्दल अशी मुक्ताफळे उधळणे हा येथील नागरिक आणि भूमिपुत्रांच्या भावनांचा अपमान आहे. पिंपरी-चिंचवडकरांच्या अस्मितेचा अपमान खपवून घेणार नाही, असा इशारा सत्ताधारी भाजपचे आमदार शंकर जगताप यांनी आयुक्तांना दिला आहे.

आयुक्तांच्या विधानाचा निषेध करणारी पोस्ट आमदार शंकर जगताप यांनी समाजमाध्यमातील फेसबुकवर टाकली आहे. त्यात आमदार जगताप म्हणतात, ‘पिंपरी-चिंचवड ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि महासाधू मोरया गोसावी यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेली अन् चापेकर बंधूंसारख्या क्रांतीकारकांच्या बलिदानाने पावन झालेली ऐतिहासिक भूमी आहे. अशा पवित्र भूमीबद्दल ‘जगात कोणी ओळखत नाही’ असे विधान करणे, म्हणजे या मातीचा आणि संस्कृतीचा अवमान आहे’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत असताना, पिंपरी-चिंचवडने या प्रगतीत ‘इंडस्ट्रियल इंजिन’ म्हणून मोठी भूमिका बजावली आहे. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दूरदृष्टीने या शहराला ‘आयटी हब’ आणि ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित करण्यासाठी जे बळ दिले, त्यामुळेच आज हे शहर जगाच्या नकाशावर ठळकपणे चमकत आहे. टाटा, मर्सिडीज बेंझ आणि फोक्सवॅगन सारख्या कंपन्यांमुळे आज आपली ओळख सातासमुद्रापार आहे’.

‘हे वैभव इथल्या कष्टकरी, भूमिपुत्रांच्या त्यागातून उभे राहिले आहे. आपल्या जमिनी देऊन या शहराला प्रगत बनवण्यासाठी स्थानिकांनी मोठे योगदान दिले आहे. प्रशासकीय प्रमुखाच्या खुर्चीवर बसून शहराच्या गौरवशाली इतिहासाची आणि प्रगतीची थट्टा करणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आयुक्तांच्या या विधानामुळे उद्योजक, तरुण पिढी आणि सामान्य पिंपरी-चिंचवडकरांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. माझा आयुक्तांना सल्ला आहे की, त्यांनी शहराची ओळख शोधण्यापेक्षा महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यावर आणि प्रलंबित विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे. पिंपरी-चिंचवडची ओळख पुसण्याचा किंवा येथील भूमिपुत्रांच्या अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न कोणीही करू नये’, असा सल्ला आमदार जगताप यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते आयुक्त?

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाला जगात ओळख आहे. परंतु, पिंपरी-चिंचवडला जगात काेण ओळखत नसल्याचे विधान महापालिका आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी केले होते. गांधर्व महाविद्यालयाचे १२५ वे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. जगामध्ये जाळे विस्तारलेले महाविद्यालय प्रसिद्ध आहे. पिंपरी-चिंचवडला जगात काेण ओळखत नाही. पण, गांधर्व महाविद्यालयाला ओळखतात. त्याच्या मदतीने शहराला फायदा हाेईल,’ असे आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले. पत्रकारांनी शहराची ओळख जगभर असल्याचे सांगताच आयुक्तांनी दाेन वेळा शहराला जगात काेण ओळखत नाही, असे उद्गार काढले होते. आयुक्तांच्या विधानामुळे वाद सुरु झाला आहे.