‘मला महसूल खाते दिले.. मी म्हणालो ठीक आहे. मग मी शेतकरी म्हणून कृषी खात्याची जबाबदारी दिली आणि लोक मलाच शेती कशी करायची ते शिकवायला लागले. जनावरांना वठणीवर आणण्यासाठी शेतीबरोबर पशूसंगोपन खातेही दिले आणि राज्यातील कत्तलखान्यांबाबतही तुम्हीच निर्णय घ्या असेही सांगितले. उत्पादन शुल्क खाते दिले आणि त्यावर दारूबंदीची जबाबदारीही तुम्हीच घ्या असे सांगितले. तेव्हा मात्र मी थांबा म्हणालो.. एकीकडे उत्पादन शुल्क वाढवण्यासाठी दारू विकायची आणि दुसऱ्या व्यासपीठावरून दारू पिणे वाईट असे सांगायचे.. म्हणजे जरा अतीच आहे..’ महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अशा फटकेबाजीने ‘गुरूवर्य शंकरराव कानिटकर पुरस्कार’ समारंभ शनिवारी रंगला.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक गुरूवर्य शंकरराव कानिटकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘गुरूवर्य कानिटकर पुरस्कार’ देण्यात येतो. यावर्षी खडसे यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्रीपाद नाईक, विजया नाईक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव, कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, उपकार्याध्यक्ष डॉ. माधव नामजोशी, कार्यवाह डॉ. शामकांत देशमुख, सहकार्यवाह सुरेश तोडकर, प्रा. ज्योत्स्ना एकबोटे आदी उपस्थित होते.
यावेळी खडसे यांनी फटकेबाजी करत आपला बारा खात्यांचा प्रवास उलगडला. ते म्हणाले, ‘कार्यकर्त्यांला त्याच्या यशासाठी समाजाच्या सहकार्याची आवश्यकता असते. समाजाचे, मतदारांचे प्रेम यांमुळे सगळी जबाबदारी पेलतो आहे. चांगल्या कारभारासाठी आणि त्याचे परिणाम दिसण्यासाठी थोडे थांबावे लागेल.’ अजून बरेच पुढे जायचे आहे, असा सूचक इशाराही खडसे यांनी दिला.
यावेळी नाईक म्हणाले, ‘शिक्षण हे फक्त नोकरी मिळावी यासाठी असू नये. समाजाचे ऋण फेडण्यासाठी शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे. मात्र, त्यासाठी शिक्षणातून तसे संस्कार मिळाले पाहिजेत. हे संस्कार जसे शिक्षणसंस्थांकडून होणे गरजेचे आहे, तसेच ते पालकांकडून होणेही गरजेचे आहे.’