पुणे : राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना उमेदवाराला मतदान करण्यात येणार असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (२१ मे) पत्रकारांशी बोलताना जाहीर केली. शिवसेना सांगेल त्या उमेदवाराला अतिरिक्त मतदान केले जाईल. मग तो उमेदवार संभाजीराजे छत्रपती किंवा अन्य कोणी असो, त्यालाच मतदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. आमच्याकडे असलेली अतिरिक्त मते शिवसेनेच्या उमेदवाराला देण्यात येतील, असा शब्द गेल्या निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आला होता, असे शरद पवार यांनी सांगितले.

“दोन वर्षापूर्वी शिवसेनेकडून एक अधिकची जागा घेतली होती”

शरद पवार म्हणाले, “दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये आमचा एकच उमेदवार निवडून येऊ शकत होता. त्यावेळी दुसरा उमेदवार मीच असल्याने आम्ही ती जागा मागून घेतली. त्यामुळे मी आणि फौजिया खान खासदार झालो होतो. पुढच्या वेळी अधिकची एक जागा आम्हाला मिळाली पाहिजे अशी मागणी शिवसेनेने केली होती.”

हेही वाचा : मोठी बातमी! शरद पवार यांचा राज्यसभेसाठी संभाजीराजेंना पाठिंबा, विजयाचा फॉर्म्युला सांगत म्हणाले…

“अतिरिक्त मते शिवसेनेच्या उमेदवाराला देणार”

“शिवसेनेच्या मागणीनुसार आता आमचा एक उमेदवार विजयी झाल्यानंतर अतिरिक्त मते शिवसेनेच्या उमेदवाराला देण्यात येतील. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांकडे असलेल्या मतांच्या बळावर सहावा उमेदवार विजयी होऊ शकेल,” असा दावाही पवार यांनी केला.