उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत नेहमीच अनेक तर्कवितर्क लावले जातात. मात्र, आता अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांनी थेट प्रश्न विचारलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या २ वर्षांनंतर आता अजित पवार मुख्यमंत्री होतील म्हणून भाजपाकडून त्यांना अडचणीत आणलं जातंय का? असा प्रश्न विचारला गेल्यानंतर शरद पवार यांनी त्याचं थेट उत्तर दिलंय. राज्यात महाविकासआघाडीचं तीन पक्षांचं सरकार बनवताना या सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे असेल ही गोष्ट सर्वांनी एकमताने मान्य केल्याची माहिती त्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांनी सरकार बनवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी या सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे असेल ही गोष्ट सर्वांनी एकमताने मान्य केलीय. त्यामुळे दुसरी कुणी व्यक्ती त्या ठिकाणी येण्याबाबतचा विषय येणार नाही.”

“माझं मत म्हणजे राष्ट्रवादीसाठी आदेश”

आगामी काळात महाविकासआघाडीचे पक्ष एकत्र लढणार का? असा प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “माझं मत म्हणजे राष्ट्रवादीसाठी आदेश असतो. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र लढायचं की कसं लढायचं हे त्यांनी एकत्र बसून ठरवावं. त्यांनी ठरवलं की मग ते मला सांगतील, मग मी योग्य आहे की नाही ते सांगेल. हे त्यांच्या कानात सांगेल, माध्यमांना सांगणार नाही.”

“वसुलीची ‘ती’ चिप कशी असते हे फडणवीसांनी एकदा दाखवावं, आमच्याही ज्ञानात भर पडेल”

शरद पवार म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी कोणती चीप आहे ते एकदा दाखवावं. ही चीप कशी असते, त्यातून वसुली कशी होते हे सांगावं म्हणजे याबाबत आमच्याही ज्ञानात भर पडेल. मीही मुख्यमंत्री पदावर होतो. जी व्यक्ती ५ वर्षे महाराष्ट्राची मुख्यमंत्री असते त्याने टीका आणि टिपण्णी करताना काही पथ्य पाळायची असतात. मुख्यमंत्री पद ही एक संस्था आहे. त्याची प्रतिष्ठा ठेवावी लागते.”

“फडणवीसांना सत्ता नाही, ती गेली याचं दुःख होतंय”

“देवेंद्र फडणवीसांकडून या प्रतिष्ठेला धक्का लागेल असं मी काही वाचलं नव्हतं, पण आज सत्ता नाही, ती गेली याचं त्यांना इतकं दुःख होतंय. त्यांनी परवाच मी अजूनही मुख्यमंत्री आहेच असं सांगितलं. त्यांना सत्ता मिळवल्याशिवाय चैन पडणार नाही. त्यामुळे ते अखंड असं काहीतरी बोलतील, अशा निष्कर्षावर यावं की काय असं वाटतंय,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

“फडणवीसांना बंगालप्रमाणे राष्ट्रभक्त महाराष्ट्रात तयार होऊ देणार नाही असं म्हणायचंय का?”

शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही असं फडणवीस म्हणाले. त्यांना रविंद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस यांच्यासारखं योगदान महाराष्ट्रात होऊ देणार नाही, त्या दर्जाचे नेतृत्व किंवा त्या दर्जाचे कवी, राष्ट्रभक्त महाराष्ट्रात होऊ देणार नाही असं म्हणायचं आहे का? जी व्यक्ती मुख्यमंत्री होती त्यांनी २ राज्यांविषयी असं बोलू नये.”

हेही वाचा : “पाहुण्यांची आपल्याला चिंता नसते”, पवार कुटुंबीयांवरील छाप्यांवरून शरद पवारांचा खोचक टोला!

“सत्ता हातातून गेली की देवेंद्र फडणवीसांना सहन होत नाही. फडणवीस आणि त्यांचा पक्ष अतिशय अस्वस्थ आहे. त्याचेच हे परिणाम आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar comment on whether ajit pawar will be cm or not in mva government pbs
First published on: 16-10-2021 at 19:19 IST