सहकारातील नव्या कायद्यानुसार छोटीशी चूकही महागात पडेल

लोकसभा, विधानसभा, राज्यसभा अशा माध्यमातून जवळपास ४९ वर्षे राजकारणात आहे. मात्र, सहकारी संस्थेचा पदाधिकारी कधीही झालो नाही. कारण मला तसे ‘धाडस’ कधी झाले नाही, अशी टिप्पणी ज्येष्ठ खासदार शरद पवार यांनी बुधवारी भोसरीत बोलताना केली. बदललेल्या सहकार कायद्यांचा संदर्भ देत संचालकांनी थोडीशी चूक केली तरी थेट तुरूंगात रवानगी होऊ शकते, असे सहकारातील ‘वास्तव’ त्यांनी निदर्शनास आणून दिले.

अण्णासाहेब मगर बँकेच्या लांडेवाडी चौकातील नव्या वास्तूचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार महेश लांडगे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, विलास लांडे, दिलीप मोहिते, महापौर शकुंतला धराडे, बँकेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, सहकारी संस्थेचा पदाधिकारी नसलो तरी सहकारात मी सातत्याने मदत करत असतो. राज्यात सहकाराची चळवळ अलीकडे वाढली. मात्र, वैकुंठभाई मेहता, धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील यांचे सहकारातील बहुमूल्य योगदान विसरता येणार नाही. राज्यातील जनतेचा सहकारी बँकांवर विश्वास आहे. सहकारी बँका न टिकल्यास त्याचा सामान्य नागरिकांना फटका बसू शकतो. सहकारातील कायद्यांमध्ये बदल झाले आहेत. त्यानुसार, एक चूक सर्व संचालकांना आत जाण्यासाठी पुरेशी ठरू शकते. त्यामुळे नीट कारभार केला पाहिजे. िपपरी-चिंचवडच्या विकासात महत्वपूर्ण योगदान असणाऱ्या अण्णासाहेब मगर यांच्यासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नेत्याचे बँकेला नाव दिलेल्या मगर बँकेने गेल्या १६ वर्षांत केलेली कामगिरी कौतुकास्पद असल्याचे पवार यांनी नमूद केले. प्रास्तविक नंदकुमार लांडे यांनी केले. राजेश सस्ते यांनी आभार मानले. सुनील थिगळे यांनी सूत्रसंचालन केले.

खासदार साबळे माझे गाववाले

या बँकेच्या १०० व्या शाखेच्या कार्यक्रमाला मला आमंत्रित करा, असे विधान खासदार अमर साबळे यांनी केले. तो धागा पकडून शरद पवार गमतीने म्हणाले, बँकेने  १६ वर्षांत १० शाखा सुरू केल्या असल्याने १०० व्या शाखेसाठी किती वर्षे लागतील, याचा विचार करा. साबळेंना नक्की कार्यक्रमाला यायचे आहे की स्वत:चे आयुष्य वाढवून घ्यायचे आहे. आयुष्य वाढणार असल्यास साबळे यांना शुभेच्छाच आहेत. कारण, ते माझे ‘गाववाले’ आहेत. १०० व्या शाखेचा सोहळा पाहायला आम्ही कोणी राहणार नाही आणि इतकी वर्षे जगण्याची इच्छाही नाही.