“बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं, त्यांचं लिखाण माझ्या मते शिवछत्रपतींवर इतका अन्याय दुसरा कोणी केलेला नाही,” असं मत नुकतेच पुण्यातील डॉ.श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचार प्रवाह ग्रंथाचे प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले होते. यावरच सोमवारी एका जाहीर कार्यक्रमातील भाषणात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “स्वतःला प्रोजेक्शन मिळवण्यासाठी आपण दुसऱ्यावर टीका करून लोकांना विचलित करण्यापेक्षा तुम्ही पर्याय द्या,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना लगावला आहे.

महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार २०२२ चे वितरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. डॉ. गो. बं. देगलूरकर यांना २०२२ चा श्री बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी लोकांना मान्य होईल आणि पटेल असा पर्याय उपलब्ध करुन द्यावा असं आवाहन पुरंदरेंवर टीका करणाऱ्यांना केलं आहे.

“मला या व्यासपीठावरून हेच मांडायचं होतं की स्वतःला प्रोजेक्शन मिळवण्यासाठी आपण दुसऱ्यावर टीका करून ज्या व्यक्तिमत्वाचा समाजाला उपयोग होणार आहे, त्या व्यक्तिमत्वाने जे संशोधन केलं ते संशोधन लोकांना उपयोगी पडणार आहे त्याच्यापासून लोकांना विचलित करतात,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच पुढे पाटील यांनी, “तुम्ही पर्याय द्या. जे आहे ते नष्ट करायचं असेल तर त्याच्यापेक्षा प्रभावी तुम्ही पर्याय द्या. असा पर्याय द्या की जो लोकांना पटला पाहिजे. लोकांना ते तुम्ही फुकट वाटा पण तुम्ही जे लिहिलेलं आहे ते खरं असेल त्याच्यामध्ये काही दम असेल तर लोक वाचतील,” असंही म्हटलं.

काय म्हणाले होते शरद पवार ?
“महात्मा फुले यांनी रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी शोधली. त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती असा न करता ‘कुळवाडी भूषण’ असा केला. मात्र बाबासाहेब पुरंदरे यांनी खोटा इतिहास पसरवला. माझ्यामते शिवछत्रपतींवर इतका अन्याय कोणी केला नाही. शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेबांच्या लिखाणातून छत्रपती शिवजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय झाला”, असं पवार म्हणाले होते. नुकतेच पुण्यात इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचे प्रकाशन झाले त्या कार्यक्रमात शरद पवारांनी हे मत मांडले होते.

तसेच पवार यांनी, “जे काही लिखाण त्यांनी केलं, जी काही मांडणी त्यांनी केली. ती मांडणी ज्याला सत्यावर विश्वास आहे तो घटक कधीही मान्य करणार नाही. नाही त्या व्यक्तींचं महत्व वाढवण्यासाठी त्याची काळजी त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. रामदासाचं योगदान काय? दादोजी कोंडदेवाचं योगदान काय? या सगळ्या खोलामध्ये मी जाऊ इच्छित नाही. पण एक गोष्ट चांगली झाली. की, महाराष्ट्र सरकारने एका काळात उत्तम खेळाडूंना दादोजी कोंडदेव पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यावर वाद-विवाद झाले आणि २००८ मध्ये राज्य सरकारने दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक, गुरू होते का नाही, याचा सखोल अभ्यास करण्याचे काम समितीवर सोपवले. त्या समितीने सखोल अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढला, की दादोजी कोंडदेव व शिवछत्रपतींचा काहीच संबंध नव्हता. शिवाजी महाराजांना जर कोणी दिशा दिली असेल, तर ती राजमाता जिजाऊंनी दिली आहे. यानंतर दादोजी कोंडदेव हा पुरस्कार काढण्यात आला,” असंही म्हटलं होतं.