बारामती : ‘दुष्काळी परिस्थितीमध्ये पाऊस पडला नाही तर माणसे कशी जगवायची हा प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी घेतलेले वैयक्तिक कर्ज आणि महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे,’ अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा पाहणी दौरा सुरू केला आहे. शुक्रवारी त्यांनी पुरंदर तालुक्यातील परिंचे गावात भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

पवार म्हणाले,‘ राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी संकटात आहे. राज्य सरकारने या संकटाला सामोरे जाण्याची ताकद शेतकऱ्यांना द्यावी. दुष्काळी परिस्थितीमध्ये पाऊस पडला नाही तर माणसे कशी जगवायची हा प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी घेतलेले वैयक्तिक कर्ज आणि महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे’

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २७ सप्टेंबर रोजी पत्र लिहले. त्यानुसार राज्य सरकारने काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला, तर काही तालुक्यांमध्ये अद्यापही दुष्काळ जाहीर झालेला नाही. तो जाहीर करण्यात यावा, अशी मागणी आहे.’ असेही पवार म्हणाले.

‘रोजगार हमी योजनेच्या कामांचे निकष शिथिल करावेत. रोजगार हमीची कामे सुरू करावीत. पिण्याच्या पाण्यासाठी तहसीलदारांना टँकर सुरू करण्याचे अधिकार द्यावेत. शेतकऱ्याची कृषी पंपाची वीज खंडित करू नये, भारनियमन करू नये. या मागण्या आहेत.’ असे पवार यांनी सांगितले.

‘लोकांची भावना काय आहे, याची माहिती घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी दुष्काळी भागाचा पाहणी दौरा करत आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्या राज्य सरकारपर्यंत पोहोचविणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी पुन्हा चर्चा करून या संकटातून कसा मार्ग काढता येईल, त्याकडे लक्ष देणार आहे.’ असही त्यांनी नमूद केले.