बारामती: पुणे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे दोन ऑक्टोबरपासून बारामती, पुरंदर आणि दौंड या तालुक्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक परिस्थिती, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्याबरोबरच दुष्काळी उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत.

राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, दौंड, इंदापूर, भोर, वेल्हा, शिरूर आणि खेड या आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात बारामती, पुरंदर आणि दौंड या तालुक्यांचा दौरा शरद पवार करणार आहेत.

दरम्यान, बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षामध्ये फूट पडली असून, कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र गट तयार करून भाजपला पाठिंबा दिला आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) हे एकत्र निवडणूक लढविणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचेही पॅनेल आहे.

या निवडणुकीत दोन्ही ‘राष्ट्रवादी’चे पॅनेल आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवानेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जाणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा दुष्काळी भागाचा दौरा या कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या बारामती आणि पुरंदर या भागात होणार आहे. या दौऱ्यात शेतकऱ्यांनी संवाद साधण्याबरोबर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा फायदा कारखान्याच्या निवडणुकीत होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.