सुंदर भावगीतांना दातेंच्या गळय़ाने ऐवज चढविला

दाते हे मूळचे मध्य प्रदेशातील इंदूरचे. क्षिप्रा नदीच्या तीरावरील संगीताच्या रियाजाने त्यांना घडविले.

शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे शरद पवार यांच्या हस्ते अरुण दाते यांना राम कदम पुरस्कार रविवारी प्रदान करण्यात आला. श्यामल गायकवाड, आमेर सालेम, लक्ष्मीकांत खाबिया, विजय कदम, प्रशांत जगताप, शकुंतला धराडे, अनिल भोसले या वेळी उपस्थित होते.

शरद पवार यांच्या हस्ते अरुण दाते यांना राम कदम पुरस्कार प्रदान
शुक्रतारा आणि स्वरगंगेच्या काठावरती अशा अनेक सुंदर भावगीतांना अरुण दाते यांनी आपल्या गळय़ाने ऐवज चढविला आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचा रविवारी गौरव केला. त्यांची गीते मराठी माणसांच्या मुखात आहेत आणि कोणत्याही पिढीतील व्यक्ती सहजपणे गुणगुणताना आढळून येतात, असेही पवार म्हणाले.
शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे शरद पवार यांच्या हस्ते अरुण दाते यांना राम कदम पुरस्कार प्रदान करण्यात आला. महापौर प्रशांत जगताप, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, प्रसिद्ध पाश्र्वगायक सुरेश वाडकर, दुबई येथील उद्योजक आमेर सालेम, दरोडे-जोग समूहाचे नितीन दरोडे, आमदार अनिल भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, राम कदम यांचे पुत्र विजय कदम, कन्या श्यामल गायकवाड आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया या वेळी उपस्थित होते. अमरावती येथील शेखर पाटील यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दाते हे मूळचे मध्य प्रदेशातील इंदूरचे. क्षिप्रा नदीच्या तीरावरील संगीताच्या रियाजाने त्यांना घडविले. संगीत जतन करण्यासाठी त्यांनी अखंड परिश्रम घेतले आहेत, असे पवार यांनी सांगितले. कला, साहित्य आणि संगीताचा सन्मान करण्याची भूमिका महाराष्ट्राने जाणीवपूर्वक जोपासली आहे. या प्रतिष्ठानने पुरस्काराच्या दर्जामध्ये सातत्य राहील याची दक्षता घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. गुणिजनांचा कार्यक्रम असेल तर पुणेकर गर्दी करतात आणि त्यातून हा कार्यक्रम विनामूल्य असल्याने गर्दी झाली, अशी टिप्पणीही पवार यांनी केली. सुरेश वाडकर बोलण्यासाठी आले तेव्हा रसिकांनी त्यांना गाणे म्हणण्याचा आग्रह केला. नेत्यांसारखे कपडे घालून आलो आहे तर थोडं तरी बोलू द्या, अशी विनंती वाडकर करीत अरुभय्यांना ऐकता ऐकता लहानाचा मोठा झालो, असे गौरवोद्गार काढले. ‘मेघा रे मेघा रे मत परदेस जा रे’ या गीताच्या चार ओळी त्यांनी ऐकविल्या. प्रशांत जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. लक्ष्मीकांत खाबिया यांनी प्रास्ताविक केले.

अरुभय्यांना ‘पद्म’ मिळावे
अरुभय्यांना महाराष्ट्रामध्ये अनेक पुरस्कार मिळाले, पण राष्ट्रीय पातळीवर अद्याप त्यांचा सन्मान झालेला नाही. त्यांच्यापेक्षा लहान व्यक्तींना पद्मश्री, पद्मभूषण मिळाला आहे. त्यांच्या हयातीत पद्म पुरस्काराचा प्रयत्न व्हावा यासाठी मी कलाकारांचे शहनशाह शरद पवार साहेबांना लोटांगण घालतो, असे सुरेश वाडकर म्हणाले. अरुभय्यांप्रमाणे मीही वयाने मोठा होत असून, त्यांना पद्म मिळाले तर पुढे माझाही नंबर लागेल, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sharad pawar give ram kadam award to arun date