Sharad Pawar latest Health Update : शरद पवार रुबी रुग्णालयात; डॉक्टरांनी प्रकृतीबाबत नेमकं काय सांगितलं? राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर शरद पवारांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केल्या जात होत्या. यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्यासह रुबी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
शरद पवार यांच्यावर उपचार करत असलेले डॉक्टर अभिजित लोढा यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना सागितले की, शरद पवार यांना थोडं फिजीकल एक्झर्शन झाल्यामुळे त्यांच्या छातीत कफ झाला आहे. तसेच त्यांनी शरद पवारांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे आणि त्यांच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या उपचारांमध्ये काही बदल करायचे असतील तर करू .
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?
रुबी हॉल रुग्णालयाचे डॉक्टर लोढा म्हणाले की, शरद पवारांना थकवा आला आहे. त्यांना छातीत कफ झाला आहे त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. शरद पवारांची प्रकृती स्थिर आहे. तपासण्यांचा अहवाल आल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. शरद पवारांना किती दिवस रुग्णालयात रहावं लागेल याचा निर्णयही या अहवालानंतरच घेतला जाईल. शरद पवारांची प्रकृती आत्ता स्थिर आहे. काळजी करण्यासारखं आत्ता तरी काही नाही. शरद पवार यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेलं नाही. तर शरद पवार हे प्रायव्हेट रुममध्ये आहेत अशी माहिती रुबी रुग्णालयाचे डॉ. लोढा यांनी माध्यमांना दिली.
रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना अवाहन
मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण अजिबात हॉस्पिटलकडे येऊ नका, कारण येथे इतरही रुग्ण आहेत. आत्ताच जसं डॉक्टरांनी सांगितलं की पवार साहेबांची तब्येत आता नॉर्मल आहे. ते आयसीयूमध्ये नाहीत, एका प्रायव्हेट रूममध्ये आहेत. आत्ताच त्यांच्याशी मी स्वतः चर्चा करून आलो आहे. त्यामुळे कुठेही घाबरण्यासारखं किंवा चिंता करण्यासारखं अजिबात काहीही नाही. गेल्या १२-१३ दिवसात पवार साहेब बऱ्याच ठिकाणी जात होते आणि लोकांना भेटत होते, यामुळे ताण आलाय आणि कफ झाला आहे. पुढच्या काही वेळात रिपोर्ट येतील, असे रोहित पवार म्हणाले.
माझ्या अंदाजाने इथेच एक-दोन दिवस ठेवलं जाईल आणि त्यांच्या प्रायव्हेट गाडीने त्यांना मुंबईला नेलं जाईल, शरद पवारांना कुणालाही भेटता येणार नाही, असेही रोहित पवार म्हणाले.
शरद पवार बारामती येथील त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी होते. मात्र अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले . शरद पवारांचे पुतणे श्रीनिवास पवार यांनी सांगितलं शरद पवार यांना होणारा कफाचा त्रास रविवारी रात्रीपासून वाढला आहे, त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
