पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना बुधवारी (४ नोव्हेंबर) पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून, प्रकृतीत सुधारणा झाली आहे. रुग्णालयातून थेट मुंबईतील निवासस्थानी रवाना होणार असल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोगतज्ज्ञ, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ के. ग्रँट यांनी अधिकृत निवेदनाद्वारे दिली.
खोकला आणि छातीत दुखण्याचा त्रास जाणवू लागल्याने शरद पवार यांना सोमवारी (२ नोव्हेंबर) रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी त्यांनी ग्रामीण भागाचा दौरा सुरू केला होता. या दौऱ्यात दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून पाणीटंचाई, पिकांची स्थिती आणि शेतीसमोरील अडचणी जाणून घेतल्या जात होत्या. मात्र, दौऱ्यादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी दौरा अर्ध्यावरच थांबविला. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
श्वास घेताना तसेच खोकताना छातीत वेदना होत असल्याने डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. डॉ. पुरवेझ ग्रँट यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. दोन दिवसांच्या उपचारांनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. बुधवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून, ते उत्तम असल्याचे डॉ. ग्रँट यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
यंदा तिसऱ्यांदा रुग्णालयात
शरद पवार यांना यंदा तिसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापूर्वी ९ फेब्रुवारीला छातीतील संसर्ग आणि खोकल्याच्या त्रासामुळे त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर १४ फेब्रुवारीला त्यांना घरी सोडण्यात आले. त्यानंतर २२ फेब्रुवारीला सौम्य निर्जलीकरणाचा त्रास झाल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २५ फेब्रुवारीला त्यांना घरी सोडण्यात आले. आता नोव्हेंबरमध्ये पुन्हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले. दोन दिवसांच्या उपचारांनंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना बुधवारी घरी सोडण्यात आले असून, ते मुंबईतील निवासस्थानी रवाना झाले आहेत.
