बारामती : इंडिया आघाडीतील पक्षांनी एकत्र येऊन काम करावे, अशी सर्वांची भूमिका आहे. मतभेदांवर तोडगा काढून मार्ग काढण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षांनी टोकाची भूमिका घेऊ नये,’ असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला.
बारामती येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘आगामी तीन वर्षे कोणत्याच निवडणुका नसल्याने सर्वांना एकत्र करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. देशात सध्या दोन प्रमुख राजकीय गट दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि त्यांचे सहकारी यांचा एक गट, तसेच त्यांचा विचार पटत नसलेला दुसरा गट आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीतील काही पक्ष हे एकत्र, तर काही ठिकाणी विरोधात लढले. त्यामुळे प्रमुख नेत्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कोणत्याही पक्षाने टोकाची भूमिका घेऊ नये. इंडिया आघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)पक्षाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे या बैठकीला उपस्थित राहिल्या, असून पुढील चर्चा दिल्लीत होणार आहे.’
‘कर्जमाफीच्या निकषांमध्ये सुधारणा करावी’
कर्जमाफीच्या निकषांबाबत पवार म्हणाले, ‘कर्जमाफी योजनेतील अनेक अटी अडचणीच्या आहेत. त्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील संबंधित लोकांशी चर्चा करून त्या अटी कशा दुरुस्त करता येतील आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळेल, याकडे लक्ष दिले पाहिजे. केळी आणि ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून तज्ज्ञांचे एक पथक पाहणीसाठी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल आला आहे. त्यांनी काय करणे आवश्यक आहे, याचे निवेदन आमच्याकडे दिले आहे.’
‘यवतमाळसह काही भागांत शेतकरी आत्महत्यांची समस्या गंभीर बनली आहे. या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी लोकशाही मार्गाने संघर्षाची गरज आहे. ‘अल निनो’च्या संभाव्य परिणामांबाबत सरकारने योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.’ असेही पवार यांनी सांगितले.
