बारामती : सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार असल्याच्या चर्चेवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना भाष्य केले. त्याचप्रमाणे, नीरा नदीच्या पाहणीबाबतही त्यांनी भूमिका मांडली.

शरद पवार यांनी बारामती येथे गोविंद बागेत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थींचे विसर्जन झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नीरा नदीच्या प्रदूषणाबाबत पाहणी केली. याबाबतही शरद पवार यांनी शनिवारी स्पष्टीकरण दिले. ‘अजितदादा गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा मैदानात उतरून काम करावे लागेल, असे वाटते का? त्याच दृष्टीने नदीची पाहणी तुम्ही केली का,’ असे पत्रकारांनी विचारले असता, पवार म्हणाले, ‘आमची जी नवी पिढी आहे तिला प्रोत्साहित करणे आणि अजितदादांच्या जाण्यामुळे जे नुकसान झाले आहे ते भरून काढण्यासाठी जे जे करता येईल ते करणे महत्त्वाचे आहे.’

‘पाणी प्रदूषणामुळे फार लोकांना यातना आहेत,’ असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराला एक दिवस उलटत नाही, तोच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) या पक्षामध्ये राजकीय घडामोडी सुरू झाल्या असून, खासदार सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीचीपदाची शपथ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची पवार कुटुंबाला पूर्वकल्पना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी याविषयी माहिती नसल्याचे सांगितले.

शरद पवार म्हणाले, ‘सुनेत्रा पवार यांनी शपथ घेण्याचा निर्णय हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पक्षाचे प्रमुख तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी काय ठरवले, त्यावर भाष्य करणार नाही. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल मला माहिती नाही. सुनेत्रा पवारांसोबत कोणतीही चर्चा झालेला नाही.’

पवार कुटुंबातील सून महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री होणार आहे, त्याबाबत तुमच्या मनात काय भावना आहेत, असा प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, ‘घडलेली घटना अत्यंत दुःखदायकच आहे; पण तरी काम चालू ठेवण्यासाठी कोणाला तरी पुढे यावे लागते. पुढे येऊन जबाबदारी घ्यायला लागते. यामुळे सामान्य जनतेमध्ये विश्वास निर्माण होण्यास मदत होऊ शकते.’

‘दोन्ही’ राष्ट्रवादी एकत्र येण्याचे अजित पवार यांचे स्वप्न

‘राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र येण्याबाबत विचारणा करण्यात आली असता, ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, ‘दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र येण्याचे अजित पवार यांचे स्वप्न होते. त्या दृष्टीने चर्चा सुरू झाल्या होत्या.’