पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, निवडणुकीवेळी ही परिस्थिती उद्धभवली असताना पंतप्रधानांनी निवडणूक झाल्यानंतर काटकसरीचे आवाहन का केले, ही परिस्थिती सांगण्यास एवढा उशीर का केला, अशी विचारणा ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे गुरुवारी केली.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची गुरुवारी मोदीबाग येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, प्रवक्ते अंकुश काकडे, विकास लवांडे यावेळी उपस्थित होते. मंत्र्यांनी सरकारी वाहनांचा ताफा कमी करून एक किंवा दोन दिवसांसाठी प्रतिकात्मक काटकसर फार फरक पडणार नाही. त्यात सातत्य अपेक्षित आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, ‘ पंतप्रधानांनी आर्थिक काटकसर करण्याचे आवाहन केले आहे, याचा अर्थ परिस्थिती गंभीर आहे. केंद्र आणि राज्य शासनाने त्यासंदर्भात गांभीर्य दाखविणे आवश्यक आहे. पाच राज्यातील निवडणुका सुरू असतानाच ही परिस्थिती उद्धभवली होती. मात्र, पंतप्ऱ्ादांनी त्यावेळी जनतेमध्ये जागरूकता निर्माण केली नाही. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आर्थिक काटकसरीचे आवाहन पंतप्रधानांनी केले. त्यातून आर्थिक व्यवस्था अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी.’
पंतप्रधानांसह राज्याच्या मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांनी त्याच्या सरकारी ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली आहे. काही पायी चालत आहेत. मात्र, त्याचा दिखावा न करता त त्यामध्ये सातत्य असावे. तसे केल्यास नागरिक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेतील. दरम्यान, माझ्या ताफ्यात गेल्या चार वर्षांपासून केवळ तीनच वाहने असून माझ्या ताफ्यात बदल करण्याची विनंती केली असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
नीट पेपरफुटीवरून शरद पवारांची सरकारवर टीका
नीट परीक्षेचा पेपर फुटल्यासंदर्भातही शरद पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘ प्रशासनाला या परीक्षा घेताना पुरेशी काळजी घेण्यात अपयश आले आहे. व्यवस्था किती बिघडली हे यावरून स्पष्ट होत असून लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात गेले आहे.’
त्यांचा कोण कसा वापर करून घेत आहे हे पाहणे गरजेचे – शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आल्यानंतर तटकरे यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यासंदर्भात बोलताना पवार म्हणाले, ‘तटकरे प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आले होते. प्रफुल्ल पटेल २००३ पासून माझ्याबरोबर संसदेत काम उत्तम काम करत होते. तर, तटकरे अर्थमंत्री, पक्षाचच्या राज्याचे प्रमुख होते. त्यांनीही चांगले काम केले. मात्र, आता त्यांचा कोण कसा वापर करून घेत आहे, हे पाहिले पाहिजे.’
