scorecardresearch

शरद पवारांचा पिंपरीत मेट्रो प्रवास

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी सकाळी पिंपरी-चिंचवडला येऊन मेट्रो स्थानकांची पाहणी करून मेट्रोतून प्रवासही केला.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी मेट्रोतून प्रवास केला तसेच स्थानकांची पाहणी केली.

भाजपचा जळफळाट

पिंपरी: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी सकाळी पिंपरी-चिंचवडला येऊन मेट्रो स्थानकांची पाहणी करून मेट्रोतून प्रवासही केला. मात्र, पवारांच्या या दौऱ्यावरून भाजपचा प्रचंड जळफळाट झाला. या प्रकरणात भाजपकडून मेट्रो व्यवस्थापनाला लक्ष्य करण्यात आले आहे. मेट्रो प्रकल्पाची महत्त्वाची प्रक्रिया भाजपच्या माध्यमातून झालेली असताना पवारांकडून आयते श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. पिंपरीच्या महापौरांनीही या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

महामेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी मार्गावरील फुगेवाडी ते संत तुकारामनगर टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी पवार सकाळी नऊ वाजताच शहरात दाखल झाले. राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, पिंपरीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर अंकुश काकडे, पिंपरी पालिकेतील गटनेते राजू मिसाळ, महिलाध्यक्षा वैशाली काळभोर यांच्यासह मेट्रोचे महाव्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आणि मेट्रोचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

तिकिट खिडकीवर जाऊन पवारांनी तिकीट घेतले. फुगेवाडी ते संत तुकारामनगर स्थानक असा प्रवासही त्यांनी केला. त्यानंतर झालेल्या बैठकीत पवारांसमोर मेट्रोचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी पवारांनी काही सूचनाही केल्या. दोन तासाच्या या दौऱ्यात पवारांनी पिंपरी-चिंचवडविषयीच्या गतस्मृतींना उजाळा दिला. पवारांचा दौरा पूर्ण होताच भाजपने थयथयाट सुरू केला. भाजप प्रदेशाध्य चंद्रकात पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीवर टीका करतानाच मेट्रोविरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्याचे सांगितले. भाजपला मेट्रोकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महापौर, आयुक्त अंधारात

शहराचे महापौर आणि महापालिका आयुक्तांना डावलून मेट्रो व्यवस्थापनाने आयोजित केलेल्या पाहणी दौऱ्यावरून पिंपरीचे राजकारणही ढवळून निघाले. महापौरांनी मेट्रो व्यवस्थापनाचा निषेध करत मेट्रोच्या अधिकाऱ्यांची केंद्र व राज्य सरकारकडे तक्रार करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. मेट्रोने अशाप्रकारे दौऱ्याचे आयोजन केलेच कसे, आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही की विश्वासात घेतले नाही. मेट्रोची आजची कृती अत्यंत बेजबाबदारपणाची आहे, अशी टीका महापौरांनी केली.

शरद पवारांच्या उपस्थितीत मेट्रोची चाचणी म्हणजे आयत्या पिठावर रेघोटय़ा मारण्याचा प्रकार आहे. जणू काही पवारांमुळे मेट्रो प्रकल्प झाला, असे भासवण्याचा हा प्रकार आहे. पुणे व पिंपरीतील पदाधिकाऱ्यांना डावलून ही चाचणी घेतल्याबद्दल मेट्रो प्रशासनाच्या विरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार आहोत. पवारांचा पक्ष देशात आणि राज्यात सत्तेत होता, तेव्हाच मेट्रो प्रकल्प रखडला होता. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदावर असताना मेट्रोसाठी आवश्यक सर्व परवानगी मिळवून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या एका टप्प्याचे उद्घाटन करण्याचे ठरले आहे. करोनामुळे हा कार्यक्रम लांबणीवर पडला. नेमकी हीच संधी साधून पवारांच्या उपस्थितीत सोमवारी मेट्रोची चाचणी करून घेण्यात आली. पुण्यात आठ आमदार आहेत. गिरीश बापट, प्रकाश जावडेकर खासदार आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांना मेट्रोने सन्मानाने बोलवायचे होते. केवळ पवारांना बोलवून त्यांना मेट्रोचे श्रेय देण्याचा प्रयत्न करण्यात आला, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे.

– चंद्रकांत पाटील, आमदार व प्रदेशाध्यक्ष, भाजप

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar metro station journey politics ysh

ताज्या बातम्या