दसऱ्याच्या दिवशी नागपूर येथील भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांनी मांडलेली हिंदूुत्वाची भूमिका सरकारी माध्यम असलेल्या दूरदर्शनद्वारे दाखवून भारतीय जनता पक्षाने त्यांची नीती काय राहणार याचे चित्र स्पष्ट केले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केली. दसऱ्याच्याच दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यात आले. या परिवर्तनाच्या दिवसाबाबत मात्र या माध्यमातून एकही कार्यक्रम दाखविला नाही, असेही पवार म्हणाले.
पुणे जिल्ह्य़ातील २१ विधानसभा मतदारसंघातील प्रचाराचा प्रारंभ करण्याच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात पवार बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच अजित पवार, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह शहर, जिल्ह्य़ातील पक्षाचे पदाधिकारी व उमेदवार या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांनी दसऱ्याच्या संमेलनात हिंदूुत्वाची भूमिका मांडली. इतरांसाठी आपली वेगळी नीती आहे, हे कळत- नकळत त्यातून सांगण्यात आले. हे भाषण सरकारी माध्यमातून देशाला दाखविण्यात आले. त्यातून भाजपची पुढची पावले काय आहेत, हे स्पष्ट झाले. दसऱ्याच्याच दिवशी डॉ. आंबेडकरांनी धर्मपरिवर्तन केले. अनेक लोक बौद्ध झाले. समतेच्या या पुजाऱ्याला वंदन करण्याचा कार्यक्रम दीक्षाभूमीत झाला. त्याबाबत एकही कार्यक्रम दाखविण्यात आला नाही.  त्यामुळे समता व परिवर्तनाबाबत भाजपची नीती काय राहणार, याचे चित्र त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा काळ चिंतेचा व जागृत राहण्याचा आहे.
परिवर्तन व समतेबाबत राष्ट्रवादी तडजोड करणार नाही, असे सांगून ते म्हणाले, आंबेडकर, शाहू, फुलेंचा विचार परिवर्तनाचा आहे. त्यावर आधारित शासन देण्याची आमची संकल्पना आहे. पुरोगामी विचाराला साथ देण्यास तयार असणाऱ्यांना आम्ही बरोबर घेऊन जाणार आहोत. पुरोगामी विचारांची व सर्वाच्या हिताची जपणूक करणारा महाराष्ट्र हवा असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहिले पाहिजे. केंद्रात सत्ता आल्यानंतर तीन- चार महिन्यांतच भाजपच्या पाठिंब्याला ओहोटी लागण्यास सुरुवात झाली आहे.
‘कमळाबाई, सांगते या पक्षाची, नजर दुसऱ्या पक्षाशी’
बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करून शरद पवार म्हणाले, ‘‘ठाकरे यांनी स्वाभिमानाची संघटना उभारली. भाजपबद्दल त्यांची मते स्पष्ट असायची. त्यांनी भाजपचा उल्लेख कमळाबाई म्हणून केला. ही कमळाबाई सांगते या पक्षाची, नजर मात्र दुसऱ्या पक्षाशी, असे ते म्हणायचे. ज्यांनी शिवसेना स्थापन केली, त्यांची भाजपबाबत भावना वेगळी होती. त्यामुळे भाजपपासून वेगळे होण्याचे समाधान अनेकांना वाटते.