पुणे : ‘सगळे ज्ञान आपल्यालाच असते असे नाही. त्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी सुसंवाद आवश्यक असतो. महाराष्ट्राची प्रशासकीय यंत्रणा देशात चांगली आहे. हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संवाद ठेवल्यास नियमात बसवून काम मार्गी कसे लावता येते, हे शिकायला मिळते,’ अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजकीय नेत्यांना कानपिचक्या दिल्या.

निवृत्त प्रशासकीय अधिकारी शिवाजीराव देशमुख यांनी लिहिलेल्या ‘आठवणींची ओंजळ’ या पुस्तकाचे प्रकाशन यशदा येथे झाले. शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्या वेळी पवार बोलत होते. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मंत्री शशिकांत सुतार, माजी मुख्य सचिव अजित निंबाळकर, सुमित मलिक, डॉ. नितीन करीर, ‘यशदा’चे महासंचालक सुहास दिवसे आदी या वेळी उपस्थित होते. पुस्तकाच्या संपादन साह्यासाठी ज्येष्ठ पत्रकार मल्हार अरणकल्ले आणि डॉ. सुधीर भोंगळे यांचा सत्कार करण्यात आला.

पवार म्हणाले, ‘पूर्वी केंद्र सरकारमध्ये बिहारमधील सनदी अधिकाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक होते. मी अनेक अधिकाऱ्यांबरोबर काम केले. लोकांसाठी यंत्रणा कशी वापरायची, हे त्यांच्याकडून शिकलो.’ संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर संरक्षण खात्याची फारशी माहिती मला नव्हती. लेफ्टनंट मोठा की कर्नल मोठा हेही माहीत नव्हते. रँक माहिती नव्हत्या. मी दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला गेलो आणि जनरल थोरात यांच्याकडून तीन दिवस सगळी रचना समजून घेतली. सीमेवरचे प्रश्न जाणून घेतले,’ असे पवार यांनी सांगितले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जनरल थोरात यांच्याकडून सर्व काही शिकवून घेतल्याचा अनुभव देखील त्यांनी सांगितला.

‘प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना शिवाजीराव देशमुख यांनी केलेले काम उल्लेखनीय होते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला शिस्त यावी म्हणून मी देशमुख यांना त्यांच्या निवृत्तीनंतर महासंचालकपदाबाबत विचारले. त्यांनी त्याला होकार देत जबाबदारी स्वीकारल्यामुळेच ही संस्था जगातील साखर संस्थांना मार्गदर्शन करणारी संस्था झाली,’ असे त्यांनी सांगितले. ‘यशदा’चे महासंचालक सुहास दिवसे यांनी प्रास्ताविक केले. अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी आभार मानले.

‘राजकारणात खरे बोलण्यास मान्यता नाही’

‘राजकारणात स्पष्ट आणि खरे बोलण्याला मान्यता नाही. मात्र, मी राजकीय खोटे बोलत नाही. करतो, बघतो ही राजकारणाची भाषा आहे. पण, जे असेल ते स्पष्टपणे सांगणे असा स्वभाव असल्याने कोणीही कार्यकर्ते फारसे आपल्या जवळ येत नव्हते,’ अशी आठवण नितीन गडकरी यांनी सांगितली.