पुणे : ‘पक्ष फुटेल असे वाटले नव्हते. मूलभूत विचारांमध्ये अंतर निर्माण झाल्याने फूट पडली. मात्र, फुटीची चिंता नाही. आगामी निवडणुकांनंतर वेगळे चित्र पाहायला मिळेल,’ असे भाकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी केले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात पवार बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार अमोल कोल्हे, नीलेश लंके, रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आदी या वेळी उपस्थित होते.
‘काही संकटे आली तरी नाऊमेद न होता पक्ष पुढे नेण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले. सन १९८० मध्ये माझ्या हातात सत्ता नव्हती. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत ५० आमदार निवडून आले; पण अल्पावधीत सहा वगळता सर्व पक्ष सोडून गेले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत माझ्या पक्षाच्या आमदारांची संख्या ७२ झाली आणि पक्ष सत्तेत आला. त्यामुळे चिंता करू नका. एकसंध राहून जनतेबरोबरची बांधिलकी कायम ठेवल्यास सर्व काही ठीक होईल. कोणी आले आणि गेले तरी काही फरक पडत नाही. एकसंध राहिलो, तर सत्ता येते, हा अनुभव आहे,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.
‘पक्षाच्या सर्व नेत्यांनी कार्यकर्ता म्हणून कष्ट केले. त्यामुळे पक्ष पुढे आला. जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे काम पक्षाने केले. पक्षाला मिळालेली प्रतिष्ठा ही कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळेच आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना जास्त संधी दिली जाईल,’ असेही पवार यांनी स्पष्ट केले.
सुळे म्हणाल्या, ‘आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, असे विचारले तर तो शरद पवारांचा असेच सांगितले जाते. ही केवळ एक धारणा नसून, वास्तव आहे. पक्षाची स्थापना आणि गेल्या २६ वर्षांचा प्रवास हा सर्वांच्या कष्टाने झाला आहे. यश-अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असल्याने हतबल होण्याची गरज नाही. शरद पवारांनी संघटना कशासाठी उभी केली, पक्षाची विचारधारा काय आहे, याची सर्वांना माहिती हवी. सत्ता मिळविणे हे लक्ष्य नाही, तर सामान्य जनतेची सेवा करणे, हा विचार महत्त्वाचा आहे. देशाच्या धोरण निश्चितीमध्ये पक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, हे सर्वश्रुत आहे.’
‘एका ताटात जेवल्याचे ‘ते’ विसरले’
‘पक्षवाढीमध्ये या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आणि नसलेल्यांचेही मोठे योगदान आहे. ज्यांनी कधी ना कधी आपल्या बरोबर काम केले आहे, त्यांची जाणीव माणसाने कायम ठेवली पाहिजे. मी त्यांच्यावर थेट टीका करत नाही, अशी माझ्याबाबत तक्रार केली जाते. मात्र, चार निवडणुकांपैकी तीनमध्ये त्यांनी मला मदत केली होती. एका निवडणुकीत त्यांनी विरोध केला. एका ताटात जेवलो, हे ते विसरले असतील. पण, माझ्यावरील संस्कारांनुसार मी ते कधीही विसरू शकणार नाही,’ अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
‘तुकाराम विरुद्ध नथुराम अशी लढाई’
‘एके काळी देशात भाजपचे दोन खासदार होते. तोच भाजप आज देशातील सर्वांत मोठा पक्ष आहे. त्यामुळे सगळ्यांनी ताकदीने काम केले, तर राज्याची लढाई पुन्हा जिंकू. ही लढाई ‘तुकाराम विरुद्ध नथुराम’ अशी आहे, हे लक्षात ठेवावे लागेल,’ असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. ‘आपण सगळे तुकाराम महाराजांच्या विचारांचे आहोत. त्यामुळे रस्त्यावर उतरून काम करण्याची भूमिका घ्यावी लागेल,’ असेही ते म्हणाले.