Premium

पुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”

पुणे लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तूतू-मैमै सुरू आहे.

sharad pawar
शरद पवारांनी पुणे लोकसभा मतदारसंघाबद्दल भाष्य केलं आहे.

पुणे लोकसभा निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदार संघावर शनिवारी ( २७ मे ) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दावा केला. यानंतर काँग्रेस नेते, माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांना उत्तर दिलं होतं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार काय म्हणाले?

अजित पवारांनी म्हटलं की, “लोकसभा निवडणुकीला एक वर्ष राहिले आहे. त्यामुळे पुण्यासाठी पोटनिवडणूक लागणार नाही, असे वाटले होतं. मात्र, पोटनिवडणूक लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यात आमची ताकद जास्त असल्याने आम्ही पुण्याची जागा लढविण्यासाठी इच्छुक आहोत.”

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिलीच, आता काँग्रेसवासी…”, आशिष शेलारांचा घणाघात

“सध्याची परिस्थिती पाहता राष्ट्रवादीची ताकद इतर घटक पक्षांच्या तुलनेत जास्त आहे. महानगरपालिकेत आम्ही आमची ताकद दाखवली आहे. आमचे ४० नगरसेवक होते. आमच्या मित्र पक्षाचे दहा नगरसेवक होते. शहरात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. ज्या ठिकाणची निवडणूक लागेल त्या ठिकाणी आमच्या घटक पक्षांपैकी कोणाची ताकद जास्त असेल, त्यांना ती जागा मिळावी,” असं मत अजित पवारांनी मांडलं.

“महाविकास आघाडीत खडा टाकू नये”

अजित पवारांच्या विधानावर विजय वडेट्टीवर म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसने पराभवाचा निकष लावून पुण्यावर दावा सांगणं चुकीचं आहे. अजित पवारांनी महाविकास आघाडीत खडा टाकू नये. आपल्याला बरोबर राहत भक्कमपणे निवडणुकीला सामोरं जायचं आहे.”

हेही वाचा : “हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

“सगळेच पक्ष दावा करतात, पण…”

याबद्दल शरद पवार यांना पुण्यात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवारांनी म्हटलं की, “ठिक आहे बघूया… योग्य काय आहे ते बघूया… काँग्रेस, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही तिघेही एकत्र बसून यातून मार्ग काढू. यात चिंता करण्याचं कारण नाही. मागणी आणि दावा सगळेच पक्ष करतात. पण, शेवटी कोण प्रभावीपणे लढत विजय संपादन करू शकतो, ते बघावं लागेल.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-05-2023 at 20:39 IST
Next Story
पुणे: भाजपची नऊ वर्षे, काँग्रेसचे नऊ प्रश्न