पुणे : ‘जंतरमंतरवरील तरुणांच्या आंदोलनामुळे सरकारला संवादाची भूमिका घ्यावी लागली. देशातील तरुणाईच्या लढ्याचा हा विजय असून, विद्यार्थ्यांसमोर केंद्र सरकार वाकले. लोकशाहीच्या दृष्टीने ही महत्त्वाची घडामोड आहे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा. त्यांच्याशी चर्चेसाठी सकारात्मक भूमिका घेण्याचा सल्ला दिला होता, असेही पवार म्हणाले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे आंदोलन, त्यांच्यावर झालेल्या पोलीस बळाचा वापर करण्याबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेवर टीका केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला राजीनामा हा विद्यार्थ्यांनी त्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी सुरू केलेल्या लढ्याचे मोठे यश असून केंद्र सरकार विद्यार्थ्यांसमोर उशिरा का होईना वाकले, असे पवार म्हणाले. देशाची तरुण पिढी अन्याय, अत्याचार जेथे असेल तेथे स्तब्ध राहणार नाही, हे या आंदोलनावरून दिसते, असेही त्यांनी सांगितले.
देशातील लोकशाही कात टाकत असल्याचे हे लक्षण असून, त्याचे संपूर्ण श्रेय देशातील तरुणाईला जाते. युवा शक्तीचा हा विजय आहे. संयमाने आणि शांततेने युवा पिढीने त्यांच्या मागण्या केंद्र सरकारकडे मांडल्या त्याला यश आले. लोकशाहीमध्ये संवाद हाच मार्ग असतो. पंतप्रधानांना भेटून आंदोलनकर्त्यांशी चर्चा सुरू करण्याची विनंती केली होती. सरकारने प्रतिनिधी पाठवावा किंवा योग्य मार्गाने प्रश्न सोडवावा, अशी भूमिका आपण मांडली होती. त्याला यश आल्याचे दिसते.
आंदोलन करणाऱ्या तरुण पिढीशी संवाद साधण्याऐवजी केंद्र सरकारने लाठीमार, अश्रुधुराचा वापर आणि पोलीस कारवाई केली, या भूमिकेवर पवार यांनी जोरदार टीका केली. आंदोलनादरम्यान अनेक तरुण आणि विशेषतः तरुणींवर कारवाई झाली, ती टाळता आली असती. जंतरमंतरकडे जाणारी मेट्रो सेवा बंद ठेवल्यामुळे सामान्य नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. आंदोलन मोडीत काढण्यासाठी करण्यात आलेल्या या उपाययोजनांमुळे सरकारची प्रतिमा अधिकच खराब झाली, असेही पवार म्हणाले.
भाजपच्या नेतृत्वाबद्दल त्यांच्या पक्षात जी अस्वस्थता आहे, त्याचा सध्याच्या राजकीय परिस्थितीत फायदा घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे भाष्य पवार यांनी केले. राजकीय प्रश्नांवर बोलताना पवार यांनी कोणत्याही प्रकारच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले.
प्रश्न सुटला हेच महत्त्वाचे
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार मदत करण्यासाठी गेले होते,’ अशी टीका काही जणांकडून होत आहे? या प्रश्नाला उत्तर देताना ‘प्रश्न सुटला हेच महत्त्वाचे आहे,’ असे सांगत त्यावर अधिक बोलणे पवार यांनी टाळले. या प्रकारानंतर आता तरी केंद्र सरकारला अक्कल यावी, अशी अपेक्षा आहे. ‘त्यांच्या कार्यशैलीत बदल होईल की नाही, हे मात्र सांगता येत नाही’, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीला अजून तीन वर्षे
तेरा वर्षांपूर्वी २०१२ मध्ये अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर देशात मोठा राजकीय बदल झाला होता. त्याचप्रमाणे जंतरमंतर येथे झालेल्या या आंदोलनाचा २०२९ च्या लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल का? या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले, २०२९ ला अजून तीन वर्षे आहेत. त्याची चर्चा आताच कशाला करायची.
