पुणे : ‘अजित पवार यांच्या मनात काय आहे, हे माहिती नाही. सार्वजनिक जीवनात किंवा राजकारणात निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका ज्यांनी घेतली असते, त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार असतो. जिथे अनुकूल वातावरण असते, तेथून निवडणूक लढविली जाते,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बारामतीमधून निवडणूक न लढविण्याच्या अजित पवार यांच्या विधानावर दिली.
स्वातंत्रदिनावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना बारामतीमधून निवडणूक लढविण्यात रस नाही. बारामती मधून सात ते आठ वेळा निवडून आलो आहे. कार्यकर्त्यांची मागणी असेल आणि संसदीय समितीने निर्णय घेतला तर, बारामतीमधून जय पवार यांना उमेदवारी मिळू शकते, असे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा >>>कृषि विभागातील २५८ पदांच्या भरतीसाठी स्पर्धा परीक्षार्थी आक्रमक
‘अजित पवार यांच्या मनात नक्की काय आहे, हे माहिती नाही. मात्र त्यांना अनुकूल असलेल्या ठिकाणाहून ते निवडणूक लढतील. त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे,’ असे शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘एक देश, एक निवडणूक’ यावरही पवार यांनी भाष्य केले.
स्वातंत्रदिनावेळी लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक देश, एक निवडणूक ही संकल्पना मांडली. सर्व निवडणुका एकाचवेळी व्हाव्यात, असा त्यांचा आग्रह होता. मात्र दुसऱ्याच दिवशी निवडणूक आयोगाने तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. पंतप्रधान बोलतात एक आणि यंत्रणा दुसराच निर्णय घेते, याची प्रचिती यानिमित्ताने आल्याची टीका पवार यांनी केली.
हेही वाचा >>>सायबर चोरट्यांकडून महिलांची १४ लाखांची फसवणूक
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक पुढे ढकलण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना पवार म्हणाले की, ’योजनेसाठी निवडणूक पुढे ढकलण्यात आली की नाही, हे माहिती नाही. मात्र राज्य सरकारच्या अन्य अनेक योजना, छोट्या घटकांना दिलेल्या सुविधा यासाठी आवश्यक रकमेची तरतूद नाही. काही दिवसांपूर्वी मी शैक्षणिक संस्थांची बैठक घेतली. शिष्यवृत्तीच्या रकमा मोठ्या प्रमाणावर थकल्या असल्याचे या बैठकीत मला सांगण्यात आले. या परिस्थितीत नवी आर्थिक बोजा वाढविणे योग्य नाही. मात्र मुख्यमंत्री त्याबबतची भूमिका मांडतील.’ दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देण्यास पवार यांनी नकार दिला.