पिंपरी : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांनी लक्ष घातले आहे. पहिल्यांदाच पवार यांनी चिंचवडमध्ये रोड-शो काढला. पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्राचारार्थ पवार यांनी चिंचवडमध्ये रोड-शो काढला. या रोड-शोला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरावर दोन्ही गटांनी लक्ष घातले आहे. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचेही शहरात सातत्याने दौरे होत आहेत. शरद पवार यांनी शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी तिन्ही मतदारसंघ आपल्या पक्षाकडे घेतले आहेत. बुधवारी भोसरीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्यासाठी जाहीर सभा घेतल्यानंतर आज चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यासाठी रोड-शो काढला. नागरिकांचा रोड-शोला चांगला प्रतिसाद मिळाला. शरद पवार टेम्पोमधून सर्वांना हात उंचावून नमस्कार करत होते. त्यांना पाहण्यासाठी रोड-शोच्या मार्गावर दोन्ही बाजुंनी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

सांगवी येथील साई चौक येथून भव्य रोड-शोला सुरुवात झाली. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारीच्या जय घोषात वाजत-गाजत हजारोच्या संख्येत कार्यकर्ते,पदाधिकारी सहभागी झाले होते. पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर, काळेवाडी, डांगे चौक, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी मार्गे रोड-शो काढला. वाल्हेकरवाडीत जाहीर सभा होणार आहे. चिंचवड मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे. २००९ पासून जगताप कुटुंबातील सदस्य निवडून येत आहेत. आता शंकर जगताप निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर कलाटे यांचे आव्हान आहे.

Story img Loader