राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्तानमधील सामान्य नागरिक भारताचे शत्रू नसल्याचं वक्तव्य केलंय. तसेच पाकिस्तानमध्ये ज्यांना पाकिस्तानी सैन्याची मदत घेऊन सत्ता काबिज करायची आहे त्यांनाच दोन्ही देशांमध्ये तणाव हवा असतो, असंही त्यांनी नमूद केलं. शरद पवार पुण्यातील कोंढवा परिसरात ईद मिलन कार्यक्रमात बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “सध्या जगात एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियासारखा शक्तीशाली देश युक्रेनसारख्या लहान देशावर आक्रमण करत आहे, श्रीलंकेतील तरुण रस्त्यावर उतरून लढत आहे आणि तेथील नेते भूमिगत झालेत. शेजारी पाकिस्तानमध्ये आपले बांधव राहतात तेथे एक तरुण पंतप्रधान झाला, त्याने देशाला दिशा देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला सत्तेतून बाहेर काढण्यात आलं. आता पाकिस्तानमध्ये वेगळं चित्र दिसत आहे.”

“पाकिस्तानमध्ये जेथे गेलो तेथे आमचं यथोचित स्वागत”

“लाहोर असो की कराची आम्ही पाकिस्तानमध्ये जेथे गेलो तेथे आमचं यथोचित स्वागत झालं. आम्ही आपल्या क्रिकेट संघासोबत कराचीला गेलो होतो. सामन्यानंतर खेळाडूंनी आजूबाजूची ठिकाणं पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा आम्ही नाश्त्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. मात्र, रेस्टॉरंट मालकाने आम्ही त्यांचे पाहुणे असल्याचं सांगत आमच्याकडून पैसे घेण्यास नकार दिला,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

“पाकिस्तानमधील सामान्य नागरिक भारताचे शत्रू नाहीत”

“पाकिस्तानमधील सामान्य नागरिक भारताचे शत्रू नाहीत. ज्यांना पाकिस्तानच्या सैन्याचा वापर करून सत्ता काबिज करायची आहे आणि त्यासाठी जे राजकारण करतात तेच दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात,” असंही पवारांनी नमूद केलं.

हेही वाचा : केवळ राजकारणासाठी वातावरण दूषित करू नये – पवारांचा विरोधकांवर निशाणा!

“द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे”

पवारांनी देशातील धार्मिक द्वेषाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “भारताला स्वातंत्र्य मिळालं कारण स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांमध्ये एकी होती. त्यामुळे आज जर कोणी द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या लोकांना एकत्र येऊन धडा शिकवला पाहिजे.”