Sharad Pawar on Badlapur Rape Case: बदलापूरमध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातून त्यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उच्च न्यायालयानं परवानगी नाकारली. त्यानंतर विरोधकांनी राज्यात विविध ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पुणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून भर पावसात आंदोलन करण्यात आलं. यावेळी एकीकडे सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल केला असताना शरद पवारांनी उपस्थितांना महिला सुरक्षेची शपथ दिली.
काय म्हणाले शरद पवार?
पुणे स्थानकाबाहेर शरद पवार गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते यांनी आंदोलन केलं. यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या कारभारावर टीका केली. “एका अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगाच्या निमित्ताने आज आपण एकत्र आलो आहोत. बदलापूरला बालिकेवर जो अत्याचार झाला, त्यामुळे सबंध देशात महाराष्ट्राच्या नावलौकिकाला प्रचंड धक्का बसला. महिलांच्या रक्षणाची जबाबदारी आजच्या राज्यकर्त्यांवर आहे. पण त्याची जाण राज्यकर्त्यांना राहिलेली नाही. त्यामुळे बदलापूरचा प्रकार झाल्याचा निषेध होत असताना आणखी काही ठिकाणी अशाच दुर्दैवी घटना घडल्या”, असं शरद पवार म्हणाले.
“एक दिवस महाराष्ट्रात असा जात नाही. कुठे ना कुठे भगिनींवरच्या अत्याचाराची बातमी वाचायला मिळते. हे राज्य शिवछत्रपतींचं आहे. त्यांनी आपल्या राजवटीत एका महिलेवर अत्याचार झाल्याची तक्रार आल्यानंतर त्या आरोपीचे हात कलम करण्याची शिक्षा दिली होती”, अशा शब्दांत शरद पवारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
सत्ताधाऱ्यांवर शरद पवार यांचा हल्लाबोल
“आजच्या स्थितीत जे घडलं त्याची गांभीर्यानं नोंद सरकारनं घेतली पाहिजे. संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे. मला एका गोष्टीचं दु:ख होतंय की राज्यकर्ते, राज्याचे प्रमुख आणि त्यांचे काही सहकारी म्हणतायत की बदलापूरच्या प्रकरणात विरोधक राजकारण आणतायत. मुलीबाळींवरील अत्याचाराबाबत कुणी आवाज उठवला तर त्याला राजकारण म्हणायचं हा निष्कर्ष राज्यकर्ते काढत असतील तर राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत, भगिनींकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन किती चमत्कारिक आहे याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येते”, अशा शब्दांत शरद पवारांनी सरकारवर टीकास्र सोडलं.
शरद पवारांनी उपस्थितांना दिली शपथ!
दरम्यान, यावेळी शरद पवारांनी सर्व उपस्थित आंदोलकांना महिला सुरक्षेची शपथ घेण्याचं आवाहन केलं. “मी, अशी शपथ घेतो की, मी स्त्रियांवर होणारा हिंसाचार कधीही खपवून घेणार नाही. माझे घर, माझा परिसर, माझे गाव, माझे कार्यालय अशा कोणत्याही ठिकाणी जर महिलांची छेडछाड किंवा अत्याचार होत असेल, तर त्यास मी विरोध करून त्याबद्दल आवाद उठवीन. मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधीही करणार नाही. महिलांचा सन्मान राखीन आणि या पुण्यनगरीत, महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिकाधिक सुरक्षित व भयमुक्त स्थिती बनवण्यासाठी प्रयत्न करीन. जय हिंद”, अशी शपथ यावेळी शरद पवारांपाठोपाठ आंदोलकांनी घेतली.