पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची स्वतंत्र आणि स्पष्ट भूमिका आहे. सत्तेसाठी कोणतीही तडजोड करण्याची भूमिका पक्षाची नाही. तीन वर्षांनंतर असलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा विचार करून पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी कामाला सुरुवात करावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना केले.
पक्षाच्या संघटनात्मक सक्षमीकरणाच्या पार्श्वभूमीवर निसर्ग मंगल कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते. प्रदेश सरचिटणीस रवी वरपे, रवी पवार, शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, माजी खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष विजय कोलते, यांच्यासह विविध सेलचे प्रमुख, विधानसभा अध्यक्ष, शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणुका जवळ नसल्याने पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी हाच योग्य काळ असल्याचे प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सक्रियपणे काम केले पाहिजे. जिल्हा आणि राज्य कार्यकारिणीत लवकरच बदल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. संघटना अधिक प्रभावी आणि गतिमान करण्यासाठी हे फेरबदल आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
पक्षाच्या विलीनीकरणाची किंवा पक्षातून कोणीतरी फुटण्याची कोणतीही चर्चा नाही. अशा अफवांवर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये. पक्षाला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्षाकडून या अफवा उठविल्या जातात. मात्र याकडे दुर्लक्ष करत पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी केले. सध्या कोणत्याही निवडणुका नसल्या तरीही २०२९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाला ताकद देण्याचे काम प्रत्येक कार्यकर्त्याकडून आणि पदाधिकाऱ्याकडून झाले पाहिजे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली नाराजी व्यक्त
पक्षाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची वाटचाल सुरू असल्याने आम्ही त्यांच्यासोबत आलो. पक्षाच्या वाढीसाठी तळागाळापासून काम करायचे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिला की तो पूर्ण करण्यासाठी काम करायचे. पण जेव्हा पदाचे वाटप केले जाते. त्यावेळी मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जाते.
विरोधी पक्ष म्हणून काम करताना तडजोड करायची नाही असे म्हणायचे आणि वेळ आली की कधी भाजप तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा द्यायचा, अशी भूमिका घ्यायची. असे कसे चालेल. अशी थेट विचारणा या बैठकीत करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष सत्तेत आहे त्यांनी चुकीचे भूमिका घेतली तर त्यांच्या विरोधात आपण भूमिका घेऊन त्यावर ठाम राहिले पाहिजे, असे मत देखील काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
