पुण्यात सध्या पुनर्विकासाची जोरदार चर्चा आहे. जीर्ण झालेल्या इमारती पाडून आता नवे टॉवर उभे केले जात आहेत. मधल्या काळात पुनर्विकासामुळेच पुण्यातील एक रस्ता आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर चर्चेत आला. लोकमान्यनगरमधील दोन गृहनिर्माण सोसायट्या पुनर्विकासासाठी निघाल्या आणि वादाला तोंड फुटले. परिसराचा पुनर्विकास कसा करायचा, हा या वादातील कळीचा मुद्दा. न्यायालयाने मध्यस्थी केली. दोन्ही सोसायट्यांना आपापल्या पद्धतीने पुनर्विकासाची परवानगीही दिली. आता लोकमान्यनगर परिसरात ‘रिडेव्हलपमेंट कमिंग सून’ असे फलक लागलेले दिसतात. या इमारती नव्याने उभ्या राहतील. मात्र, गर्दीच्या फुगवट्याने निर्माण झालेला पायाभूत सुविधांचा प्रश्न कसा सुटणार, याचे कोडे मात्र कायम आहे.
असो! ही गोष्ट आहे, लोकमान्यनगरच्या पुनर्विकासाने चर्चेत आलेल्या आणि शासकीय अधिकारी बनण्याची जिद्द बाळगलेल्या शेकडो तरुणांच्या गर्दीने गजबजलेल्या रस्त्याची. शहराचा मध्यवर्ती परिसर, नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रोड) उपनगरे आणि कोथरूड-कर्वेनगर परिसराला जोडणारा हा लालबहादूर शास्त्री रस्ता. कायम गर्दीने गजबजलेला. शहरातील मोठ्या रस्त्यांमधील एक म्हणून ‘एटी फीट रोड’ अशी या रस्त्याची ओळख.
इथल्या चौकाचौकांत आणि गल्लीबोळांमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे घोळके आंतरराष्ट्रीय संबंधांपासून वर्गखोल्यांमधील नातेबंधापर्यंत सगळ्याच विषयांवर चर्चा करताना दिसतात. चहाच्या प्रत्येक घोटाबरोबर प्रीलिम्स आणि मेन्ससाठीचे दिवस मोजले जातात. लालबहादूर शास्त्री रस्त्यावर या विद्यार्थ्यांमुळे एक आर्थिक घडी नव्याने बसते आहे. शिकवणी वर्ग, अभ्यासिका, वसतिगृह, खानावळी, नाश्त्याचे ठेले अशी मोठी बाजारपेठ रस्त्याच्या दुतर्फा विकसित झालेली दिसते.
अलका टॉकीजजवळ हा रस्ता सुरू होतो. अण्णा भाऊ साठे चौकातील अलका टॉकीज खऱ्या अर्थाने अनेक कहाण्यांची साक्षीदार. पहिला इंग्रजी चित्रपट याच थिएटरमध्ये बघितल्याची आठवण अनेक जण सांगतात. या इमारतीच्या शेजारीच असलेले भारती भवन हे दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांनी उभारलेल्या शैक्षणिक चळवळीची साक्ष! थोडे पुढे आल्यावर ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी नगरसेवक श्यामराव गांजवे यांच्या नावाचा चौक याच रस्त्यावर. आतल्या बाजूस असलेले एस. एम. जोशी फाउंडेशन समाजवादी चळवळीच्या पाऊलखुणा आजही जपून ठेवणारे. ठोसरपागा दफनभूमी आणि वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अनेक नामवंतांना अखेरचा निरोप मिळाला, तर ‘घर’ असून नसलेल्या अनेकांना निवारा वृद्धाश्रम उतारवयात शांतपणा अनुभवू देतो.
पुण्यातल्या स्पर्धा परीक्षेच्या परिसंस्थेचा पहिला अनुभव गांजवे चौकात मिळतो. इथून पुढच्या प्रत्येक चौकात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचे घोळके दिसतात. काही जण स्पर्धा परीक्षेतील अपयश पचवून याच रस्त्यावर नव्याने उगवलेल्या व्यवसायांमध्ये नशीब आजमावताना दिसतात. ‘रोज चहा, पोहे विकून अभ्यासासाठी काढलेले दहा लाख रुपयांचे कर्ज फिटले. आता थोडा खर्च भागवून उरलेले पैसे दुसऱ्या शाखेसाठी जमवतोय,’ सकाळी सात ते दहा या वेळात शास्त्री रस्त्यावर नाश्ता विकणाऱ्या एकाने सांगितलेली ही भावना नव्या बाजारपेठेची कल्पना यायला पुरेशी. यदुनाथ थत्ते चौकाजवळ काका हलवाई मिठाई दुकानाचे दालन आणि त्या शेजारीच असलेल्या इंदूलाल कॉम्प्लेक्सचा परिसर या नव्या परिसंस्थेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग. याच परिसरातील अभ्यासिकांमध्ये हजारो भावी अधिकाऱ्यांची स्वप्ने आकार घेतात.
‘स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. खानावळी, खोल्या, अभ्यासिका, शिकवण्या अशी त्यांची एक परिसंस्था या परिसरात तयार झालेली दिसते. मात्र, पायाभूत सुविधांचा मोठा प्रश्न आहे. अंधाऱ्या खोल्यात ते राहतात, कुठेतरी पार्किंगमध्ये क्लास, अभ्यासिका सुरू असते, अशा वेगवेगळ्या परिस्थितीत जीव धोक्यात घालून विद्यार्थी अभ्यास करतात. पार्किंग, शुद्ध पाणी, आरोग्यासाठीचे निकष आहेत पण, ते केवळ कागदावरच दिसतात. मात्र, या सगळ्या परिस्थितीमुळे त्यांच्यावरही एक ताण निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम अभ्यासावर होतो,’ असे निरीक्षण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्रवीण चव्हाण सर नोंदवतात.
या गर्दीचा ताण आणि त्यायोगे निर्माण झालेले प्रश्न कसे सोडवायचे, हा तिढा अद्यापही कायम आहे. ‘दहा-बारा वर्षांपूर्वी या रस्त्यावर फारशी गर्दी नसायची. सुरुवातीला छोटी छोटी दुकाने उघडली. आम्ही नववीत असताना काका हलवाई मिठाई दुकानाच्या शेजारी कॉफी आणि मॅगी मिळायची. त्यामुळे इथल्या परिसरात रमून जायचो. हळूहळू गर्दी वाढली. आता फूटपाथवर चालायला जागा नसते आणि हॉटेलमधून बाहेर पडणारी घाण रस्त्यावर टाकली जाते. त्यामुळे इथे फिरणेही नकोसे झाले आहे,’ अशी भावना या परिसरातील रहिवासी सिद्धेश पवार व्यक्त करतात.
नियोजनाचा तिढा असलेल्या या रस्त्यावर खुद्द सैन्याने वसवलेला परिसरही आहे. इतिहासाचे अभ्यासक सुप्रसाद पुराणिक त्या विषयी सांगतात, ‘पुण्यात १२ जुलै १९६१ ला पानशेत धरण फुटून आलेल्या पुराने या परिसराला मोठा फटका बसला. पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे अनेक लोक बेघर झाले. त्या वेळी नवी पेठेशेजारी मोकळ्या जागेत भारतीय लष्कराने लोकांची राहण्याची सोय केली. लष्कराने लवकर तयार होणारी घरे लोकांना बांधून दिली. ही साधी, स्वस्त आणि तात्पुरती अर्धगोलाकार पत्र्याची घरे म्हणजे निसेन हट्स. मेजर पीटर निसेन यांनी या घरांचा शोध लावला, म्हणून त्यांच्या नावाने ही घरे ओळखली जातात. आजही काही जुनी घरे या पेठेत टिकून आहेत. सेनेने उभारलेली घरे असणारी वस्ती म्हणून पेठेचे नाव सेनादत्त. अनेक पूरग्रस्तांचे पुनर्वसन या पेठेत झाले.’
ज्येष्ठ समाजसेवक बॅरिस्टर नाथ पै यांच्या नावाच्या चौकात माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा अर्धाकृती पुतळा आहे. पोटाचा प्रश्न मिटविण्यासाठी गोळा होणाऱ्या शेकडो कामगारांचा हा मजूर अड्डा आता कमी गजबजलेला असतो. तेथे काहींशी बोललो, तेव्हा मांगिरबाबा देवस्थानाशेजारी रिक्षा पंचायतीच्या स्टॅण्डवर वाढलेली गर्दी आणि वाहतुकीच्या प्रश्नाकडे अनेकांनी लक्ष वेधले. त्यात लोकमान्यनगरचा पुनर्विकास आणि राजकारणाचाही आवर्जून उल्लेख झाला. वैकुंठ स्मशानभूमीसमोरची भिंत रंगवून अस्ताव्यस्त पडलेल्या कचऱ्यावर तोडगा काढणाऱ्या प्रशासनाचे कौतुक काहींनी केले, तर प्रसिद्ध कीर्तनकार प्राचार्य शंकर वामन ऊर्फ सोनोपंत दांडेकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दांडेकर पुलाजवळ पडलेला कचरा आणि सगळ्या रस्त्यांवर फूटपाथचा कमी होत असलेला आकार पाहून कित्येकांनी नाराजी व्यक्त केली. स्थलांतर, गर्दी आणि विकासाची ही गोष्ट सध्या अशी सुरू आहे…
पुढच्या भागात काय ?
हाताला काम आणि पोटाला भाकरी मिळविण्यापलीकडची स्वप्ने घेऊन हजारो माणसे महानगरांत येतात. त्यांच्या घुसळणीतून महानगरांचा आकार मिनिटागणिक बदलत असला, तरी पोत काहीसा तसाच राहतो. काही पाऊलखुणा घट्ट रुतून राहतात. गर्दी वाढली, तरी रस्ते टिकतात. याच रस्त्यांच्या कहाण्या महानगरांच्या संवेदना सांगतात. पुण्याच्या पोटातील काही रस्त्यांची कहाणी सांगणारे हे पाक्षिक सदर. या पुढच्या भागात पुण्यातील कोणत्या रस्त्यावरची कहाणी जाणून घ्यायला आवडेल हे नक्की कळवा…
tushar.suryawanshi@expressindia.com
