पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदासाठीची राजकीय हालचाल पुन्हा एकदा वेग घेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या आरक्षण सोडतीत महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाल्याने, आतापर्यंत संधीपासून दूर राहिलेले अनेक नगरसेवक सक्रिय झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी महापौर पदासाठी इच्छुक असल्याचं म्हणत पक्षश्रेष्ठी नक्कीच विचार करेल अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

भाजप संघटनेत दीर्घकाळ कार्यरत असलेले शत्रुघ्न काटे हे पक्षातील निष्ठावंत चेहरा मानले जातात. २०१२ आणि २०१७ या दोन्ही महापालिका निवडणुकांमध्ये ते महापौर पदासाठी इच्छुक होते. विशेषतः २०१७ मध्ये त्यांच्या नावाची महापौरपदासाठी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, पक्षातील अंतर्गत राजकारण आणि समीकरणांमुळे ऐनवेळी त्यांची संधी हुकली आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील नितीन काळजे यांची महापौरपदी निवड झाली.

२०१७ साली पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आली होती. त्या ऐतिहासिक सत्तेचे पहिले महापौर होण्याचा मान नितीन काळजे यांना मिळाला. मात्र, या प्रक्रियेत शत्रुघ्न काटे यांना डावलले गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठीही त्यांच्या नावाचा विचार झाला; परंतु आजतागायत महापालिकेतील कोणतेही महत्त्वाचे पद त्यांच्या वाट्याला आलेले नाही.

दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघात जगताप कुटुंबाला उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावर उघड विरोध केल्यानंतर शत्रुघ्न काटे यांना शहराध्यक्ष पद मिळाले होते. त्यांनी संघटनात्मक काम सुरू ठेवत पक्षाशी निष्ठा कायम राखली.

२०२६ च्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न काटे यांच्यावर पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप शहराध्यक्ष असताना जशी भाजपला शहरात सत्ता मिळाली होती, त्याच धर्तीवर काटे यांच्या काळातही भाजपची सत्ता टिकून राहिली. या यशात संबंधित आमदार आणि संघटनेचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते.

महापौर पदासाठी स्पर्धा तीव्र होण्याची चिन्हे असून, भोसरी विधानसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगे, माऊली जगताप, जालिंदर शिंदे, शीतल शिंदे यांच्यासह अनेक नगरसेवक इच्छुक असल्याची माहिती आहे.

“मी स्वतः महापौर पदासाठी इच्छुक आहे. मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचाच असेल आणि तो आम्हाला मान्य असेल. यापूर्वी पद न मिळाल्याने मी नाराज झालो नव्हतो. संघटनेचे काम प्रामाणिकपणे करत राहिलो असून, आता पुन्हा एकदा संधी मिळण्याची अपेक्षा आहे.” – शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप.