पिंपरी : पोलिसांच्या पथकावर गोळीबार करणाऱ्या शेखर संभाजी जाधव (२५, लातूर) याला पोलिसांनी अटक केली. दिघी येथे गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या शेखरला पकडण्यासाठी रांजणगाव येथे गेलेल्या पोलिसांवर त्याने गोळीबार केला होता. पोलिसांवर गोळीबार करून तो पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अखेर त्याला शस्त्रासह अटक केली. शेखर जाधव विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे ७० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मे रोजी दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेखर जाधव आणि त्याच्या तीन साथीदारांनी गोळीबार करत खुनाचा प्रयत्न केला. या घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते. तपासादरम्यान आरोपी शेखर जाधव आणि त्याचा साथीदार मुस्तफा ऊर्फ भाईजान हे रांजणगाव परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र पोलीस आपल्या मागावर लागल्याचे लक्षात येताच आरोपींनी थेट पोलीस पथकावर गोळीबार करीत पलायन केले. या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी शेखर जाधव हा रविवारी (१४ जून) संध्याकाळी दिघीतील मोझे शाळेसमोरील मोकळ्या मैदानात येणार असल्याची गोपनीय माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते यांच्या पथकाने परिसरात सापळा रचत आरोपीला अटक केली. त्याच्यावर ७० हून अधिक चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आणि दोन गोळीबाराच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याकडून ५१ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, उपनिरीक्षक महेश खांडे, कॉन्स्टेबल नितीन उमरजकर, हर्षद कदम, गणेश कोकणे, गणेश सावंत, विनोद वीर, गणेश हिंगे, नितीन लोखंडे, सोमनाथ मोरे, चंद्रकांत गडदे, मोहसीन आत्तार, अमर कदम, समीर रासकर, विशाल गायकवाड, ज्ञानेश्वर कोळगे, अमोल गोरे, औदुंबर रोंगे यांनी केली.
चिंचवडमध्ये एकाची आत्महत्या
शेजाऱ्यांकडून त्रास होत असल्याचा नातेवाईकांचा आरोप : चिंचवड मधील वेताळनगर परिसरात एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. ही घटना रविवारी रात्री घडली. सोमनाथ वाघमारे (४०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री वेताळ नगर येथील एका इमारतीत एक तरुण फिरत असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता. माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्या तरुणाने स्वतःला घरात कोंडून घेतले. पोलीस आणि स्थानिक नागरिक त्याला दरवाजा उघडण्यास सांगत होते, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता सोमनाथ वाघमारे याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्याला तातडीने खाली उतरवण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.
नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
“शेजाऱ्यांच्या सततच्या त्रासामुळे आणि छळामुळेच सोमनाथने हे टोकाचे पाऊल उचलले आहे,” असा आरोप सोमनाथच्या नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत दोषी शेजाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. यामुळे रुग्णालयात आणि पोलीस ठाण्याच्या आवारात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
पोलिसांकडून समजूत, चौकशी सुरू
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने नातेवाईकांशी चर्चा केली. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल, तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले. याप्रकरणी पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, शेजाऱ्यांची आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या आत्महत्येमागे नेमके काय कारण होते आणि त्रासाचे स्वरूप काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत.
अफिम आणि गांजा विक्री प्रकरणी तिघांना अटक
निगडी आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये अफिम आणि गांजा विक्री प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. निगडी पोलिसांनी ओटास्किम येथून एकाला गांजा बाळगल्या प्रकरणी अटक केली. तर अमली पदार्थ विरोधी पथकाने खेड तालुक्यातील सावरदरी येथे अफिम विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक केली.
सनी शंकर थोरात (२०, निगडी) असे निगडी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सनी याने त्याच्याकडे बेकायदेशीरपणे दोन हजार रुपये किमतीचा ४० ग्रॅम गांजा बाळगला. याबाबत माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून पोलिसांनी गांजा जप्त केला आहे.
भवरलाल सोनाराम जाट (३४, चाकण), महेंद्रसिंग चिमणाराम (२५, सावरदरी, खेड) या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपी सावरदरी गावात अफिम विक्रीसाठी दुचाकीवरून आले. त्यांच्याबाबत माहिती मिळाल्याने पोलिसांनी दुचाकीवरून आलेल्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख रुपये किमतीचे ३९६ ग्रॅम अफिम, एक दुचाकी आणि दोन मोबाईल फोन जप्त केले. त्यांनी हा अफिम आरोपी महेंद्रसिंग याच्याकडून आणला असल्याचे सांगितले.
कडजाई माता मंदिरातील दानपेटी फोडली
मावळ तालुक्यातील इंदोरी येथील कडजाई माता मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दानपेटीतील रोकड चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (१२ जून) रोजी उघडकीस आली.याप्रकरणी मंदिराच्या पुजारी वनिता घनश्याम नाणेकर गुरव (५२,इंदोरी, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कुणाल बाळु विर (२३, चाकण, खेड) आणि लोबो उर्फ सुर्या सिरमोनंत दास (२६, कडाचीवाडी, चाकण) या दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आरोपींनी मंदिराचा कडीकोयंडा आणि कुलूप उचकटून गाभाऱ्यात प्रवेश केला. तेथील दानपेटी फोडून भाविकांनी दान केलेली अंदाजे सात हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
