पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक भरतीचे एक पाऊल पुढे पडले आहे. शिक्षकांची पदे रिक्त असलेल्या सर्व व्यवस्थापनांनी गटनिहाय, विषयनिहाय रिक्त पदांची माहिती, तसेच बिंदुनामावली तपासणी, कोणत्या प्रवर्गाची किती पदे रिक्त आहेत याबाबत तयारी करून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, खासगी अनुदानित शिक्षण संस्थांचे अध्यक्ष, सचिव, महापालिकांचे प्रशासन अधिकारी यांना याबाबतच्या सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.राज्यातील शिक्षकभरतीसाठी मे-जून २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२५ चा निकाल १८ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध झाला.
मुलाखतीशिवाय, मुलाखतीसह निवड यांपैकी पर्याय निवडलेल्या संस्थांमध्ये गुणवत्तेनुसार पदभरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संचमान्यतेनुसार मे २०२६ अखेरीस संभाव्य रिक्त पदे विचारात घेऊन २१ जून २०२३च्या शासन निर्णयातील नमूद मर्यादेत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२५ मधील गुणांकनाच्या आधारे शिक्षक पदभरतीसाठी मान्यता देण्यात आली आहे.
शिक्षक पदभरतीसाठी सन २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदे विचारात घेऊन भरती केली जाणार आहे. त्यासाठी विषय, आरक्षणनिहाय रिक्त पदांची माहिती तयार असणे आवश्यक आहे. आतापर्यंत २०२५-२६च्या संचमान्यतेची ९० टक्क्यांहून अधिक कार्यवाही झालेली आहे. उर्वरित संचमान्यतांतील त्रुटींची पूर्तता करून व्यवस्थापनांनी २०२५-२६च्या संचमान्यतेतील मंजूर पदानुसार बिंदुनामावली तपासून तयार ठेवणे आवश्यक आहे.
‘विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालय स्तरावर बिंदुनामावली तपासणी, पवित्र संकेतस्थळावरील कार्यवाहीसाठी यापूर्वी दिलेल्या सूचनांनुसार स्थापन केलेल्या विशेष कक्षाकडून कार्यवाही करावी, या कक्षात अनुभवी कर्मचारी, तसेच राजपत्रित अधिकारी यांचा समावेश करावा, कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होऊ नये,
यासाठी प्रचलित तरतुदी विचारात घेऊन बिंदुनामावलीची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, बिंदुनामावलीबाबत तक्रारी प्राप्त असल्यास तक्रारींची शहानिशा करूनच पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात द्यावी, त्यापूर्वी संचमान्यतेसंबंधित १०० टक्के कार्यवाही पूर्ण करणे, बिंदुनामावली मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेणे, २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाची कार्यवाही तत्काळ करावी,’ असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पेसा क्षेत्रातील भरतीबाबत…
आदिवासीबहुल नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांतील सुधारित आरक्षण बिंदुनामावली निश्चित करण्याबाबत शासन निर्णयाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रासंदर्भातील याचिकांवर दिलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील १७ संवर्गातील पदभरतीबाबत ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या तरतुदी विचारात घेऊन बिंदुनामावली तपासून घेण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
