पुणे : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय निवड प्रकारात शिफारस झालेल्या उमेदवारांना रुजू करून घेण्यासाठीच्या प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण आयुक्तालयाने जाहीर केले आहे. त्यानुसार उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत, तर ७ ते ११ सप्टेंबर या कालावधीत पात्र उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच पात्र उमेदवारांची संख्या कमी असल्यास उमेदवारांना ५ सप्टेंबरपूर्वी नियुक्त करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.

शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी याबाबत राज्यातील महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिका, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, खासगी शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष, सचिव यांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, आदिवासी विकास विभाग शासकीय शाळा, शासकीय विद्यानिकेतन, खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये पवित्र संकेतस्थळाद्वारे १३ हजार ११९ उमेदवारांची मुलाखतीशिवाय निवड पद्धतीने शिफारस करण्यात आली आहे. त्यात इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी ७,५४१, सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी ४,२०७, नववी ते दहावी या वर्गांसाठी १,११९, अकरावी ते बारावी या वर्गांसाठी २५२ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. आता या उमेदवारांना रुजू करून नियुक्त केले जाणार आहे.

उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीची, आवश्यक पात्रतेच्या कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करावी, उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती आणि त्या अनुषंगाने सादर केलेली कागदपत्रे, प्रमाणपत्रे मूळ प्रमाणपत्रांशी विसंगत आढळल्यास कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास नियुक्तीसाठी पात्र ठरविता येणार नाही. समांतर आरक्षणाचा (महिला आरक्षणवगळून) दावा केलेल्या उमेदवारांबाबतीत कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती आदेश देण्यापूर्वी उमेदवारांनी केलेल्या दाव्याची पडताळणी मूळ प्रमाणपत्रांवरून सक्षम प्राधिकारी यांच्याकडून करण्यात यावी. पडताळणीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबतची कार्यवाही करावी, जिल्हा परिषदेमध्ये ‘शिक्षण सेवक’ पदावर नव्याने नियुक्ती झालेल्या उमेदवारांस जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही, असे नियुक्ती आदेशामध्ये नमूद करावे.

उमेदवांराच्या मूळ कागदपत्रांबाबत शंका, संशय असल्यास त्याबाबतची खातरजमा संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी तत्काळ करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

चारित्र्य पडताळणी, शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याची पडताळणी आवश्यक

टीईटी परीक्षेत गैरप्रकारप्रकरणी प्रसिद्ध यादीतील उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस झाली असल्यास चारित्र्य पडताळणी केल्याशिवाय, त्यासोबत हमीपत्र घेतल्याशिवाय नियुक्ती देऊ नये. कागदपत्र पडताळणीअंती नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची चारित्र्य पडताळणी, शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याची तपासणी सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात यावी. अपात्र उमेदवारास नियुक्ती दिली गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.