जिथे केला संघर्ष.. तिथेच झाला सत्कार!

महापालिका शाळेत शिक्षण सेवक म्हणून काम करणाऱ्या प्रशांतची नुकतीच नायब तहसीलदार म्हणून निवड झाली आहे.

चार वर्षांपूर्वी ज्या शिक्षण मंडळात मानहानी झाली, जिथे अवहेलना झाली, गुणवत्ता सिद्ध करूनही जिथे शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी झगडावे लागले, त्याच शिक्षण मंडळात सन्मान आणि सत्कारही झाल्याचा आगळा अनुभव प्रशांत खेडेकर याला आला. महापालिका शाळेत शिक्षण सेवक म्हणून काम करणाऱ्या प्रशांतची नुकतीच नायब तहसीलदार म्हणून निवड झाली आहे.
शिक्षण मंडळात प्रशांतला सन्मानाने बोलावण्यात आले होते आणि त्याचा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून सन्मानचिन्ह देऊन सत्कारही करण्यात आला. मात्र, गुणवत्ता सिद्ध करूनही याच प्रशांतला शिक्षण मंडळात नोकरी मिळावी यासाठी सर्व स्तरावर झगडावे लागले होते. ही गोष्ट आहे २००८ मधील. त्या वर्षी शिक्षण सेवक भरतीसाठी राज्यस्तरीय परीक्षा झाली होती. त्या परीक्षेत प्रशांत सत्तर हजार उमेदवारांमध्ये सातवा आणि जिल्ह्य़ात पहिला आला होता. त्यानंतरच्या भरती प्रक्रियेत त्याची मुलाखत पुणे महापालिका शिक्षण मंडळात झाली होती आणि गुणवत्तेमुळे त्याला राज्यातील नऊ जिल्हा परिषदांनी शिक्षण सेवक म्हणून नियुक्त करण्याची तयारी दर्शवली होती. तशी पत्रेही त्याला आली होती. मात्र, पुणे महापालिका शिक्षण मंडळात नोकरी मिळावी या मनातील इच्छेमुळे त्याने पुणे महापालिकेला प्राधान्य दिले आणि इतर ठिकाणची नियुक्ती त्याने स्वीकारली नाही.
मुलाखतीनंतर निवड झालेल्या नव्वद उमेदवारांना शिक्षण मंडळाने नियुक्ती देणे आवश्यक होते. मात्र, मंडळाने अनेकविध कारणे पुढे करत या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे अन्य अनेक जिल्हा परिषदांची संधी हातातून गेलेली आणि पुण्यात नियुक्ती नाही, असा प्रसंग प्रशांतवर ओढवला. शिक्षण प्रमुख आणि अन्य अधिकारी काही दाद देईनात. खूप पाठपुरावा करूनही अधिकारी टाळाटाळ करायला लागले. गुणवंतांची ही व्यथा त्या वेळी माध्यमांनी चव्हाटय़ावर आणली आणि महापालिकेच्या मुख्य सभेतही या प्रकाराविरोधात नगरसेवकांनी आवाज उठवला. तत्कालीन आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेत ‘सर्वाना नियुक्तीची पत्रे द्या’ असे आदेश मंडळाला दिले आणि अखेर प्रशांत महापालिका शाळेत शिक्षण सेवक म्हणून नियुक्त झाला. पुढे तीन वर्षांनंतर तो नियमित शिक्षकही झाला.
शिक्षक म्हणून काम करत असतानाच त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली आणि आता नायब तहसीलदार म्हणून त्याची निवड झाली आह
‘आईच्या प्रोत्साहनामुळेच यश’
‘‘सासवड जवळचे गुरोळी हे माझे मूळ गाव. आई संगीता आणि वडील कैलास खेडेकर हे दोघेही प्राथमिक शिक्षक आहेत आणि आईच्या प्रोत्साहनामुळेच हे यश त्याला शक्य झाले. मंडळाने केलेला सत्कार माझ्यासाठी संस्मरणीय होता,’’ असे प्रशांत याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shikshan sevak became deputy tahasildar