पुणे:- आमदार संजय गायकवाड यांनी गोविंद पानसरेलिखित शिवाजी कोण होता, या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशक प्रशांत आबी यांनी शिविगाळ केली. त्यांनंतर सर्वस्तरातून गायकवाड यांचा निषेध करण्यात आला. तसेच शिवाजी कोण होता, या पुस्तकाची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली. गेल्या तीन दिवसात या पुस्तकाच्या दहा हजार प्रती खपल्या आहेत, अशी माहिती अॅड. असीम सरोदे यांनी दिली.

दरम्यान, आमदार संजय गायकवाड वादग्रस्त विधानप्रकरणी कोल्हापूरातील राजाराम पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे राजकीय दबावापोटी गायकवाड यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीसांना कायदेशीर नोटीस पाठवल्याचेही अॅड. असीम सरोदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

सरोदे म्हणाले, आमदार गायकवाड यांनी अत्यंत शिवराळ भाषेचा वापर करत शिवाजी कोण होता, या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आबी यांना धमकावले, शिविगाळ केली. याबाबत बुधवारी (२२ एप्रिल) राजाराम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र पोलीसांनी अचानक पवित्रा बदलला आणि दखलपात्र गुन्हा दाखल करण्याऐवजी गायकवाड यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. राजकीय दबावापोटी या गंभीर प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेणाऱ्या संबंधिक पोलीस अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच या प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आबी यांना शिवागाळ केली म्हणून, समाजमाध्यमांवरून जाहीर माफी मागितली. हा एकप्रकारे गायकवाड यांचा कबुलीजबाब आहे. त्यानुसार पोलीसांनीही कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच संजय गायकवाड जिथे-कुठे असतील, तेथून त्यांना ताब्यात घेण्यात यावे. त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी. राज्यातील एका लोकप्रतिनिधीने जबाबदार पद्धतीने वागणे अपेक्षित असते. मात्र, आमदार संजय गायकवाड यांनी वेळोवेळी वादग्रस्त विधाने, कँटीनमध्ये शिविगाळ, असे प्रकार केले. त्यांनी एखादा लोकप्रतिनिधी कसा असू नये, याचे उदाहरणच दिले आहे. त्यामुळे संजय गायकवाड यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही सरोदे यांनी केली.

संजय गायकवाड गैरप्रकार करून निवडणूक जिंकले ?

बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत अनेक गैरप्रकार केले. लोकांना धमकावले. मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप केले. असे अनेक प्रकार करत गायकवाड २०१९ मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले. याप्रकरणातही गायकवाड यांच्याविरोधात नागपूर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे, असेही अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले.