शिरुर : वैमनस्यातून सराइतावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करुन खून करण्यात आल्यचाी घटना सोमवारी सायंकाळी शिरुर-सातारा महामार्गावरील कर्डे घाटात घडली. विशाल सुनील काळेे (वय ३०, रा. ढोर आळी, शिरुर, जि. पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे.
पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल काळे हा मित्रांसोबत मोटारीतून शिरुर-सातारा मार्गावरुन निघाला होता. कर्डे घाटात हल्लेखोरांनी मोटार अडवली. मोटारीतील काळे आणि त्याच्याबरोबर असलेले दोघे जण तेथून पळून जाण्याचा प्रयत्नात होते. त्या वेळी चार ते पाच हल्लेखोरांनी पाठलाग करुन काळे याला अडवले. त्याला माराहण करुन पिस्तुलातून गोळ्या झाडल्या, तसेच डोक्यात दगड घातला. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात काळे याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढाेले. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत.
विशाल काळे हा शिरुर परिसरातील एका खून प्रकरणात आरोपी होता. खून प्रकरणात त्याला न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला होता. काळे याच्या खून प्रकऱ्णातील संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, पोलिसांची पथके त्यांच्या मागावर आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
