पुणे : शिरूर परिसरात दहशत माजविणारा गुंड इशप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पंदी याच्यासह अकरा साथीदारांविरुद्ध कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले.
विशाल पंदी, अमन उर्फ मुन्ना दस्तगीर पटेल, सनी संजय जाधव, आदित्य बापू शिंदे, आदित्य दीपक कांबळे, पांडुरंग बालाजी कांबळे, अभिषेक हनुमान मिसाळ, सिद्धेश उर्फ बाल्या तुकाराम शिंदे, सूरज उर्फ नन्या संतोष मोरे, देवांश शिवाजी चव्हाण, अशी मकोका कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पंदी याच्यासह साथीदारांना अटक करण्यात आली असून, आरोपी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. पंदी याचा साथीदार गोपाळ संजय यादव हा गुन्हा दाखल केल्यानंतर पसार झाला आहे. पंदी आणि साथीदारांविरुद्ध लोणीकंद, वाघोली, फुरसुंगी, सांगवी, तळेगाव दाभाडे, अहिल्यानगर एमआयडीसी पोलीस ठाण्यात खून, खंडणी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, पिस्तूल बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे २२ गुन्हे दाखल आहेत.
पंदी आणि साथीदारांनी वैमनस्यातून १ जून रोजी शिरूरमधील करडे घाटात विशाल सुनील काळे (वय ३१, रा. शिरूर, जि. पुणे) याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करुन खून केला होता. काळे याच्याबरोबर असलेले साथीदार केदार झाडगे, उमेश जगदाळे यांचा खुनाचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात पंदी याच्यासह साथीदारांना गुन्हे शाखा, तसेच शिरूर पोलिसांच्या पथकाने अटक केली होती.
पंदी टोळीने शिरूर परिसरात दहशत माजविली होती. त्याच्याविरुद्ध मकोका कारवाई करण्याचा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, विनोद पाटील, उपनिरीक्षक महेश डोंगरे, शुभम चव्हाण, महेश बनकर, रामदास चव्हाण, गणेश धनवे यांनी तयार केला. संबंधित प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावाला मंजुरी देऊन मकाेका कारवाईचे आदेश देण्यात आले. या प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी रवींद्र भोसले तपास करत आहेत.
