शिरूर : अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून सहा लाख रुपयांचे मेफेड्रोन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

प्रशांत फक्कड मावळे (वय २४, रा. रांजणगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. मावळे याला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी परिसरात पोलीस गस्त घालत असताना गणेगाव रस्ता परिसरात एकजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून मावळे याला अटक करण्यात आली.

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, फौजदार अविनाश थोरात, अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, सागर धुमाळ, राहुल पवार, विलास आंबेकर, किशोर शिवणकर, अमोल रासकर यांनी ही कामगिरी केली. फौजदार अविनाश थोरात तपास करत आहेत.