शिरूर: शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाग्यश्री संदीप वारे (वय ५, मूळ रा. करोडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर; सध्या रा. पिंपळसुटी, ता. शिरूर) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. याबाबतची फिर्याद तिचे काका बाबासाहेब कोंडीबा वारे यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री ही कुटुंबीयांसह मच्छिंद्र प्रल्हाद भोसले यांच्या गोठ्यात झोपली होती. बुधवारी पहाटे बिबट्याने गोठ्यात घुसून भाग्यश्रीला उचलून नेले. कुटुंबीयांनी आरडाओरडा केली. मात्र, बिबट्याने मुलीला जवळील उसाच्या शेतात नेले. त्यानंतर गावातील नागरिक, वन विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम राबवली. काही वेळाने भाग्यश्री जखमी अवस्थेत आढळून आली. तिला तातडीने न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.
पिंपळसुटी परिसरात भीतीचे वातावरण
दरम्यान, या घटनेनंतर पिंपळसुटी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.
घटनास्थळी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत खडे, स्मिता राजहंस व तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी भेट दिली.
ड्रोनने होणार पाहणी
‘यापूर्वी या परिसरात पिंजरे लावण्यात आलेले होते. पुन्हा नव्याने ६ पिंजरे लावण्यात येणार आहेत. परिसराची ड्रोनने पाहणी करण्यात येणार असून गस्त ही वाढविण्यात आली आहे . बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे ,’ असे तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले.
पिंपळसुटी परिसरातील दुसरी घटना
पिंपळसूटी परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांची संख्या वाढत आहे. गेल्या वर्षीही एका मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
