शिरूर : पिंपरखेड परिसरात गेल्या १५ दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरात ४३ पिंजरे लावण्यात आले असून, मंगळवारी सकाळी पिंपरखेड येथे एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. जेरबंद केलेल्या बिबट्यास तेथून हलविण्यास ग्रामस्थांनी विरोध केल्याने बिबट्या पिंजऱ्यातच ठेवण्यात आला आहे. पिंपरखेड आणि जांबूत परिसरात गेल्या १५ दिवसांत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन लहान मुले आणि एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर नरभक्षक बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश मुख्य वनरक्षक यांनी दिला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी ४३ पिंजरे लावण्यात आले आहेत. बिबट्याने रविवारी केलेल्या हल्ल्यात रोहन विलास बोंबे (वय १३) मृत्युमुखी पडला होता. त्या ठिकाणापासून ५० मीटर अंतरावर बिबट्याला पकडण्यात आले.
‘या बिबट्याला रोहन बोंबे या मुलावर हल्ला करण्यात आल्याच्या ठिकाणापासून ५० मीटर अंतरावर पकडण्यात आले. बिबट्या नर असून, तीन ते चार वर्षांचा आहे. जेरबंद केलेल्या बिबट्यास तेथून हलविण्यास ग्रामस्थांनी विरोध केल्याने बिबट्याला तेथेच ठेवण्यात आले आहे,’ असे तालुका वनाधिकारी नीळकंठ गव्हाणे यांनी सांगितले.
‘ग्रामस्थांनी बिबट्या स्थलांतरित न करता त्यास गोळ्या घालण्याचा आग्रह धरला आहे. या ठिकाणी दोन शार्प शूटर आहेत,’ असे गव्हाणे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बिबट्याने रविवारी केलेल्या हल्ल्यात रोहन बोंबे हा मृत्युमुखी पडला होता. अवघ्या १५ दिवसांत दोन लहान मुलांसह ज्येष्ठ महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. नागरिकांनी वनखात्याच्या वाहनाची मोडतोडही केली. त्यामुळे परिसरात तणावाचे आणि भीतीचे वातावरण आहे. पिंपरखेड आणि जांबूत परिसरातील नरभक्षक बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश देण्यात आला आहे. शिरूर शहरातील नदीकाठी अमरधाम, सुशीला पार्क आणि सूरजनगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नदीकाठी सूरजनगर, खारे मळा, शनी मंदिर, लाटे आळी, कुंभार आळी, हल्दी मोहल्ला या भागात बिबट्या दिसला आहे.
जेरबंद करण्यात आलेला बिबट्या नर असून, तीन ते चार वर्षांचा आहे. बिबट्यास तेथून हलविण्यास ग्रामस्थांनी विरोध केल्याने त्याला तेथेच ठेवण्यात आले. पकडलेल्या बिबट्याला गोळ्या घालण्याचा आग्रह ग्रामस्थांनी धरला आहे. – नीळकंठ गव्हाणे, तालुका वनाधिकारी
