शिरूर : राजणगाव एमआयडीसी परिसरातील एका गोदामातून ५४ लाख ५३ हजार रुपयांची सिगारेट चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी शंभरहून अधिक ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण तपासल्यानंतर चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
प्रथमेश ज्ञानेश्वर चव्हाण (रा. वाघोली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून सिगारेट आणि एक मालवाहू वाहन असा ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजणगाव एमआयडीसीतील एका गोदामात सिगारेट, बिस्किटे, साबण आदी माल साठवून ठेवला जातो. हा मालवाहू वाहनांतून डिलरकडे पाठविण्यात येतो. १७ डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चोरट्याने गोदामात उभ्या असलेल्या मालवाहू पिकअपमध्ये भरलेला माल घेऊन, गेटवर चलनाची नोंद करून पलायन केले. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी याबाबत दिलेल्या सूचनांनुसार तपासासाठी पथके नेमण्यात आली.
पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने शंभरहून अधिक ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण तपासले. त्यामध्ये चोरीसाटी वापरलेले वाहन काही अंतरावर सोडून देण्यात आल्याचे निदर्शनास आले. ५४ लाख ५३ हजार रुपये किमतीची सिगारेट दुसऱ्या वाहनातून नेण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांना वाघोली परिसरात संशयित वाहन सापडले. चौकशीत सुपरवायझर प्रथमेश चव्हाण याने दोघांना चोरीसाठी वाहन दिल्याची कबुली दिली. त्यानंतर चव्हाण याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीचा माल आणि वाहन असा एकूण ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्या दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर, माणिक काळकुटे व अमोल रासकर सहभागी होते. पुढील तपास अविनाश थोरात करीत आहेत.
