शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे दोन बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. आतापर्यंत शिरूर परिसरातून ५३ बिबट्यांना पकडण्यात आले आहे.

पिंपळसुटी येथे लावलेल्या दोन पिंजऱ्यांत दोन बिबटे जेरबंद झाले. एक नर आणि दुसरी मादी आहे. त्यांचे वय सुमारे दीड वर्ष आहे. दोन्ही बिबटे एकाच मादीची पिले असून, त्यांना वेगवेगळ्या पिंजऱ्यांत जेरबंद करण्यात आले. त्यानंतर दोघांना एकाच पिंजऱ्यात ठेवण्यात आले. दोघांना माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आले असल्याची माहिती तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली. शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

बिबट्यांच्या हल्ल्यात काही जणांना प्राण गमवावा लागल्याच्या घटनांमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. या पार्श्वभूमीवर, वन विभागाने शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पिंजरे लावण्याची मोहीम हाती घेतली. आतापर्यंत ३५ हून अधिक बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून, या बिबट्यांची रवानगी जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात करण्यात आली.

बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारा बिबट्या-मानव संघर्ष लक्षात घेता, नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात किंवा मोकळ्या परिसरात जाताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन गव्हाणे यांनी केले आहे.